बेळगाव लाईव्ह: राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मराठी आणि इंग्रजी फलकांवर महानगरपालिकेकडून रंग फासणे आणि कन्नड व्यतिरिक्तचे फलक जप्त करण्याच्या कारवाईवरून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने भाषिक अल्पसंख्यांक उपायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवर केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक उपायुक्तांनी बेळगावचे जिल्हाधिकारी आणि अल्पसंख्यांक विभागाचे नोडल अधिकारी यांना चौकशी करून कार्यवाही अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, राज्योत्सवाच्या निमित्ताने बेळगाव शहरातील अनेक बाजारपेठांमध्ये मराठी आणि इंग्रजी फलकांवर महानगरपालिकेच्या पथकांनी बळजबरीने रंग लावला. तसेच कन्नड व्यतिरिक्तचे फलक जप्त करण्यात आले. ही कारवाई भाषिक अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचा भंग करणारी असल्याचा आरोप समितीने केला होता.
याच संदर्भात समितीने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या WP 7525/2024 या प्रकरणातील आदेशाची प्रतही उपायुक्तांना पाठवली होती. संबंधित आदेशात कन्नड फलक लावण्याबाबत कोणावरही बळजबरी करू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच फलकांवर रंग फासण्यात आलेल्या ठिकाणांचे व्हिडिओ आणि फोटो पुरावे म्हणून सादर करण्यात आले होते.
या तक्रारीची दखल घेत केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक उपायुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणात कोणती कारवाई करण्यात आली किंवा केली जाणार आहे याचा सविस्तर अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात भाषिक अल्पसंख्यांक उपायुक्तांनी बेळगावला भेट दिली होती. त्या वेळी जिल्हा प्रशासनासोबत घेतलेल्या बैठकीत अल्पसंख्यांकांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. त्या बैठकीच्या वारंवार स्मरणपत्रांनंतरही प्रत्यक्षात कोणती कार्यवाही झाली याबाबतही ठोस स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.
हे पाचव्यांदा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे.या प्रकरणी आता जिल्हा प्रशासनाची भूमिका काय राहणार आणि चौकशी अहवालात काय निष्पन्न होते याकडे बेळगावच्या मराठी भाषिकांचे लक्ष लागले आहे.


