बेळगाव लाईव्ह : बेळगाव सीमेवर मराठी भाषिकांचा आवाज दाबण्याचा कर्नाटक सरकारने लोकशाहीविरोधी कुटील डाव पुन्हा एकदा उघड केला आहे. ‘काळ्या दिवसा’च्या शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होण्यासाठी बेळगावकडे येत असलेले कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने आणि शिवसेना नेते विजय देवणे यांना बेळगाव पोलिसांनी निपाणी तालुक्यातील कोगनोळी चेकपोस्टवर रोखले. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या एकजुटीची धास्ती घेतलेल्या पोलीस प्रशासनाने ‘कायदा आणि सुव्यवस्था’ या तकलादू कारणाखाली महाराष्ट्रातील नेत्यांवर प्रवेशबंदीचे आदेश लादले.
सीमाभागातील मराठी अस्मिता चिरडण्याच्या कर्नाटकी धोरणाचा हा आणखी एक पुरावा आहे. खासदार धैर्यशील माने आणि शिवसेना नेते विजय देवणे हे ‘काळ्या दिना’च्या निषेध फेरीमध्ये आणि सभेत सहभागी होऊन सीमावासियांना नैतिक पाठिंबा देण्यासाठी येत होते. मात्र, निपाणी तालुक्यातील कोगनोळी चेकपोस्टवर बेळगाव पोलिसांनी त्यांना अत्यंत आडमुठी भूमिका घेत अडवले.
बेळगाव पोलिसांनी नेहमीप्रमाणेच महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदीचे आदेश जाहीर करून, मराठी आवाज दाबण्याचा आणि सीमा लढ्याची धग कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांच्या या दडपशाहीच्या कारवाईमुळे शिवसैनिकांचा आणि मराठी भाषिकांचा संताप चांगलाच भडकला.
कोगनोळी टोलनाक्यावर शिवसैनिकांनी कर्नाटक सरकार आणि पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. लोकशाही राष्ट्रात शांततापूर्ण आंदोलनासाठी लोकप्रतिनिधींना इतर राज्यात जाण्यापासून रोखणे, हे कर्नाटक सरकारचे लोकशाहीविरोधी पाऊल आहे.
मात्र कर्नाटक प्रशासन कितीही आटापिटा करत अशी भूमिका घेत राहिले तरीही, सीमाभागातील जनतेला न्याय मिळेपर्यंत हा दडपशाहीचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी देत जोरदार घोषणाबाजी केली.





