बेळगाव लाईव्ह : खानापूर–बेळगाव महामार्गावरील गणेबैलजवळील भूतनाथ डोंगर परिसरात नियमांकडे दुर्लक्ष करून सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत विहार करणाऱ्या युवक–युवतींवर खानापूर पोलिसांनी रविवारी तपासणी मोहीम राबवली. वाढत्या पर्यटनामुळे निर्माण झालेल्या सुरक्षेच्या प्रश्नांची दखल घेत आणि स्थानिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
दर शनिवार–रविवारी भूतनाथ देवस्थान परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. विशेषतः युवक–युवतींची संख्या वाढल्याने रात्री उशिरापर्यंत वाहने आणि गर्दी सुरू राहते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास निर्माण होत असून धार्मिक परिसरातील शिस्त बिघडत असल्याच्या तक्रारी होत होत्या.
रविवार, दि. 23 रोजी डोंगरावर पर्यटकांची मोठी गर्दी होती. काही युवक–युवती उशिरापर्यंत डोंगरावर थांबले असल्याची माहिती 100/112 आपत्कालीन सेवेला देण्यात आली. तत्काळ खानापूर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिस निरीक्षक लालसाब गोवंडी यांनी स्वतः उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी व चौकशी केली.
तपासणीदरम्यान पोलिसांनी संबंधित युवक–युवतींना सायंकालीन पर्यटन करताना वेळेचे भान ठेवणे, धार्मिक परिसरातील शिस्त व सुरक्षा नियम पाळणे याबाबत समज दिली. तसेच हेल्मेट नसणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन अशा प्रकारच्या नियमभंगांमध्ये संबंधितांवर खानापूर पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदवण्यात आल्या.
पोलिसांनी सांगितले की, पर्यटन परिसरातील शिस्त आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा तपासणी मोहिमा पुढेही सुरू राहतील.
भूतनाथ परिसराच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी केलेल्या तत्पर कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करून पोलिसांचे कौतुक केले आहे.


