बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथील ओंकार गल्लीपासून मुख्य रस्त्यापर्यंत अनुदानातून गटार बांधणीचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. अत्यंत आवश्यक असलेल्या या कामामुळे चार गल्ल्यांतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
गावातील ८ व्या वॉर्डातील ओंकार गल्ली, नागनाथ गल्ली, थोरवत गल्ली आणि रामदेव गल्लीच्या काही भागांमध्ये गटार व्यवस्था नसल्यामुळे पाणी ओंकार गल्लीच्या टोकाशी साचत होते.
हे साचलेले पाणी शेजारच्या विहिरींमध्ये आणि खालील बाजूस असलेल्या घरांमध्ये शिरत होते. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्या कमला पाटील यांच्याकडे गटार बांधणीच्या कामासाठी सातत्याने विनंती केली होती. लोकांची समस्या लक्षात घेऊन त्यांनी प्रयत्न केले आणि ‘स्त्री योजनेतून’ सुमारे चार लाख रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर करून घेतला. या निधीतून गटार कामाला सुरुवात होऊन ते आता पूर्ण झाले आहे.
या गटाराच्या बांधणीसाठी आवश्यक असलेली जागा मा. अध्यक्ष भाऊ पाटील यांनी देऊन मोलाचे सहकार्य केले, ज्यामुळे हे काम पूर्ण करणे शक्य झाले. पीडीओ गोपाळ नाईक, सदस्य महेश धामणेकर, यल्लापा पाटील, प्रशांत पाटील, राकेश पाटील, वैजनाथ बेन्नाळकर, लता पाटील आणि इतरांनी या विकास कामाकडे जातीने लक्ष देऊन काम पूर्ण करून घेतले आहे. हे काम दर्जेदार झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.


