बेळगाव लाईव्ह :भारत आणि श्रीलंका यांच्यातील लष्करी सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘मित्र शक्ती -2025’ या संयुक्त लष्करी सरावाच्या 11 व्या आवृत्तीचा उद्घाटन समारंभ बेळगाव येथील फॉरेन ट्रेनिंग नोड येथे लष्करी थाटात मोठ्या उत्साहाने पार पडला.
संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार संयुक्त सामरिक कवायती आणि उप-पारंपारिक ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित केलेला हा सराव भारतीय सैन्य आणि श्रीलंका सैन्य यांच्यातील चिरस्थायी संरक्षण भागीदारी, आंतरकार्यक्षमता आणि परस्पर विश्वास अधोरेखित करतो. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार हा सराव केवळ लष्करी प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून तो भारत आणि श्रीलंका यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि रणनीतिक नात्यांचा बंद अधिक मजबूत करण्याचा एक प्रयत्न आहे.
या लष्करी सरावा करता मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर आणि कमांडो विंगच्या (जे एल विंग) आवारात विशेष फॉरेन ट्रेनिंग नोड तयार करण्यात आले आहे. सदर सराव 10 ते 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सुरू राहणार आहे.
भारतीय लष्कराच्या पुणे येथील दक्षिण मुख्यालया अंतर्गत संयुक्त मित्र शक्ती सरावाचा हा उपक्रम होत असून यामध्ये दोन्ही देशाच्या सैनिकांनी संयुक्त प्रशिक्षण युद्धसराव आणि रणनीतिक नियोजन यामध्ये भाग घेतला आहे.
‘मित्र शक्ती’ सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या सैन्य दलांमध्ये शहरी आणि अर्ध शहरी भागातील दहशतवाद विरोधी मोहिमा, शस्त्र सज्ज कारवाया तसेच नागरी लोकसंख्येच्या सुरक्षेसाठीचे तंत्रज्ञान आणि धोरणे या क्षेत्रांमध्ये परस्पर समन्वय वाढविणे हा आहे. बदलत्या जागतिक सुरक्षेच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर या सरावाद्वारे दोन्ही देशांनी आपल्या लष्करी तयारीत सामंजस्याने वाढ करण्याचा निर्धार केला आहे.
बेळगाव हे अनेक लष्करी संयुक्त युद्धा अभ्यासाच्या शिबिरांचे साक्षीदार असलेले शहर आहे याआधी बेळगावत भारत चीन भारत मालदीव भारत इंग्लंड अशा अनेक देशांच्या सैन्यासोबत भारतीय सैन्याने बेळगावत युद्ध सराव केला आहे आता त्यात श्रीलंकेची भर पडली आहे.


