बेळगाव लाईव्ह : किडनीच्या समस्येने त्रस्त असलेल्या एका व्यक्तीला तातडीने आर्थिक मदत देऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मानवतेचे दर्शन घडवले आहे.
गोकाक तालुक्यातील रहिवासी असलेले दस्तगीर मोघल हे गेल्या अनेक वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. मोघल कुटुंब गरीब असल्याने, उपचारांसाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते.
ही बाब लक्षात येताच, मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आपल्या विश्वासू व्यक्तींमार्फत आवश्यक असलेली रक्कम दस्तगीर यांच्या कुटुंबापर्यंत त्वरित पोहोचवली. मंत्री जारकीहोळी यांच्या या संवेदनशील मदतीचे सार्वजनिक स्तरावर कौतुक होत आहे.
किडनीच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे बरे झालेले दस्तगीर मोघल यांनी गोकाक येथील हिल गार्डन येथे मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मंत्र्यांना शाल पांघरून आणि पुष्पहार घालून त्यांचा हृद्य सत्कार केला.
यावेळी बोलताना दस्तगीर मोघल म्हणाले, “मला किडनीच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करणाऱ्या मंत्री सतीश जारकीहोळी यांचे भले होवो. ते इतरांसाठी अदृश्यपणे खूप काम करत असतात. जारकीहोळी साहुकार हे गोरगरिबांसाठी नंदादीप ठरले आहेत. मी आणि माझे कुटुंब नेहमीच साहुकारांसोबत राहू,” अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.


