बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरांमध्ये अलीकडे घडलेल्या मोटरसायकलींच्या चोरी प्रकरणी हिरेबागेवाडी पोलिसांनी काल गुरुवारी एका अट्टल दुचाकी चोरट्याला अटक केली असून त्याच्या जवळून 2 लाख 70 हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नांव अजय उर्फ अजित बसवराज बजंत्री (वय 19, रा. अळणावर) असून तो गवंडी कामगार आहे. काल गुरुवारी चोरलेल्या मोटर सायकल वरून संशयास्पदरित्या जाणाऱ्या अजय याला हिरेबागेवाडी पोलिसांनी अडवून चौकशी केली.
त्यावेळी प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अजय याने पोलीस खाक्या दाखवताच हिरेबागेवाडी पोलीस ठाणे, अळणावर पोलीस ठाणे, धारवाड उपनगर पोलीस ठाणे आणि कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी त्याच्या जवळील हिरो स्प्लेंडर प्लस क्र. केए 22 ईके 4078 किंमत 45,000 रुपये, हिरो होंडा एचएफ डिलक्स क्र. केए 25 ईएम 8053 किंमत 75,000 रु., बजाज डिस्कव्हर क्र. केए 26 एल 7735 किंमत 75,000 रु. आणि हिरो स्प्लेंडर प्लस क्र. केए 24 क्यू 5968 किंमत 75,000 रुपये अशा एकूण चार चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या.
बेळगाव ग्रामीणचे एसीपी बी. एम. गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. के. होळेण्णावर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय., उपनिरीक्षक बी. के. मिटगार, पोलीस एम. आय. तुरमरी, गुरुसिद्ध पुजारी, एम. जी. माणिकबार, महांतेश कडन्नावर आर. आर. केळगिनमनी आदींनी उपरोक्त कारवाई केली. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.




