घे भरारी… मराठा समाजातील उद्योजक व्यावसायिकांना मार्गदर्शन

0
38
 belgaum

बेळगाव लाईव्ह : “मोठी स्वप्ने बाळगा, आवड शोधा, प्रयत्न नक्की करा. यश उंबरठ्यावर थांबलेले असते; फक्त आपण दरवाजा उघडण्याची हिम्मत ठेवली पाहिजे,” असे मत युवा उद्योजक, क्रिएटर्स ग्रुपचे निलेश चौगुले यांनी मांडले.

मित्रा फाऊंडेशन (आपला समाज – आपला व्यवसाय), बेळगाव तर्फे उदयोन्मुख व्यावसायिकांसाठी घे भरारी या उपक्रमाअंतर्गतसुरेखा लॉन्स, उद्यमबाग, बेळगाव येथे मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी रामकृष्ण य. पाटील (माजी व्हाइस चेअरमन, झुआरी अ‍ॅग्रो, गोवा) यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला छ. शिवराय यांच्या मूर्तीचे पूजन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रस्तावना सौ. नम्रता काकतकर यांनी केली. उपक्रमाचा उद्देश व सामाजिक कार्याबद्दल विकास मांडेकर यांनी माहिती दिली.

नीलेश चौगुले यांनी मार्गदर्शन करताना पुढे सांगितले की, “एका सामान्य कुटुंबातून येऊनही आवड, ध्येयवेड आणि जिद्द यांच्या बळावर कोणतेही खडतर शिखर सर करता येते,” हा माझ्या जीवनाचा स्वानुभव आहे.यश मिळण्यापूर्वी जीवनप्रवासात अनेक खाच-खळगे, अडचणी व अपयश आले. पण त्या प्रत्येक अडथळ्यातून मार्ग काढत, थांबून न जाता, नव्या गोष्टी शिकत पुढे जाण्याची तयारी ठेवल्यामुळेच क्रिएटर्स ग्रूपची स्थापना शक्य झाली, असा भावनिक प्रवास त्यांनी उलगडला.

 belgaum

ते पुढे म्हणाले,
“कधीही हताश होऊ नका. परिस्थिती प्रतिकूल असली, तरी शिकणे थांबवू नका. स्वतःला विकसित करत राहणे हा यशाचा मूलमंत्र आहे.”शिक्षणाबद्दलच्या आपल्या जिव्हाळ्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, उद्योग व्यवसाय सांभाळत असतानाच पीएच.डी. अभ्यासाची तयारी देखील सध्या सुरू आहे. सतत शिक्षण घेत राहणे ही काळाची मागणी आहे, असे ते म्हणाले. आपले विचार मांडताना त्यांनी तरुणांना विशेष आवाहन केले—
“मोठी स्वप्ने बाळगा, आवड शोधा, प्रयत्न नक्की करा. यश उंबरठ्यावर थांबलेले असते; फक्त आपण दरवाजा उघडण्याची हिम्मत ठेवली पाहिजे.”


उद्योजकतेतील अंतःप्रेरणा, नवकल्पना आणि चिकाटी यांवर रामकृष्ण पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन

कार्यक्रमात झुआरी अ‍ॅग्रो, गोवाचे माजी उपाध्यक्षा रामकृष्ण यशवंतराव पाटील यांनी उद्योजक प्रेरीतरण (Entrepreneur Motivation) या विषयावर दर्शन-पत्र (PPT) सादरीकरणासह प्रभावी मार्गदर्शन केले. उद्योजकतेत यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या अंतःप्रेरणा, सर्जनशीलता, नवकल्पना, स्पर्धा, मागणी, उत्पादन, बाजारातील स्थान टिकवणे, नव्या मागणीची निर्मिती आणि विद्यमान बाजारपेठेची जाण या महत्त्वपूर्ण अंगांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली.

पाटील यांनी व्यवसायातील लाल समुद्र (Red Ocean) आणि निळा समुद्र (Blue Ocean) या आधुनिक व्यवसाय संकल्पना गुगल, फेसबुक, टेस्ला, उबर, स्पेसएक्स यांसारख्या जागतिक उद्योगसमूहांची उदाहरणे देऊन सोप्या भाषेत स्पष्ट केल्या. स्पर्धेने भरलेल्या बाजारपेठेपलीकडे नवनव्या संधींची शोधयात्रा हेच उद्योजकतेचे खरे सार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी जबाबदारी, प्रामाणिकता आणि चिकाटी या मूल्यांवर आधारलेली कार्यसंस्कृती जोपासल्यास मोठी स्वप्ने प्रत्यक्षात उतरू शकतात, असे अधोरेखित केले. कार्यक्षेत्र आणि घरगुती जीवन यांची सीमारेषा स्पष्ट ठेवल्यास मानसिक संतुलन व कार्यक्षमता वाढते, असेही त्यांनी प्रतिपादन केले.

पाटील यांनी उपस्थितांना प्रेरणादायी संदेश देत सांगितले—
“दुसऱ्यांच्या चुका पाहून शिकले पाहिजे. वेळेचा आदर करणे आणि वेळ पाळणे हे यशस्वी व्यक्तिमत्त्वाचे भक्कम आधारस्तंभ आहेत.”

अपयशाबद्दल बोलताना त्यांनी उर्जादायी विचार मांडला—
“कधी अपयश आले, तरी पुढेच पडा… कारण पुढे पडणे म्हणजे पुढे जाण्याची सुरुवात.”

सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवतही अर्थपूर्ण आणि उपयुक्त जीवन जगता येते, याची त्यांनी अनुभवाधिष्ठित उदाहरणांसह उपस्थितांना जाणीव करून दिली. त्यांच्या सहज, सोप्या आणि वास्तववादी मांडणीमुळे सर्व श्रोत्यांना उद्योजकतेचे व्यावहारिक पैलू समजून घेण्याची संधी मिळाली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ किरमीटे यांनी केले. आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर बेळगांवकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमास उद्यमबाग परिसरातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मित्रा फाऊंडेशनच्या सर्व सभासदांचे मोलाचे योगदान लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.