बेळगाव लाईव्ह : गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण आत्मसात करून विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी शोधू नये, तर उद्योजक बनून इतरांना रोजगार द्यावा आणि देशाच्या राष्ट्रनिर्माणात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले. राणी चन्नम्मा विद्यापीठाचा १४ वा वार्षिक दीक्षांत समारंभ बेळगावातील सुवर्ण विधानसौध येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या समारंभात राज्यपाल गेहलोत यांनी पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संबोधित केले. राणी चन्नम्मा विद्यापीठाने पदव्युत्तर परीक्षेचा निकाल लागल्यानंतर केवळ ५० दिवसांत दीक्षांत समारंभ आयोजित करून तसेच १८ महिन्यांत तीन दीक्षांत समारंभ घेऊन एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
यावेळी बेळगावचे ‘अण्णा हजारे’ म्हणून ख्यातनाम झालेले समाजसेवक शिवाजीराव छत्रू कागणीकर यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. हा सन्मान स्वीकारल्यानंतर कागणीकर यांनी आनंद व्यक्त केला, मात्र देशाच्या सद्यस्थितीवर त्यांनी खंत व्यक्त केली.
ते म्हणाले की, “स्वराज्याला ७६ वर्षे झाली, तरीही देशातील समस्या सुटलेल्या नाहीत. आजही देशातील ७० टक्के लोक शेती आणि मोलमजुरीवर अवलंबून आहेत आणि कष्ट करून अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.” कागणीकर यांच्यासह विनोद दोड्डण्णवर (शिक्षण/समाजसेवा) आणि बसवराज येलीगार (साहित्य/समाजसेवा) यांनाही मानद डॉक्टरेट देण्यात आली.
या दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे एकूण ३८,४१५ विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर पदवीसाठी पात्र ठरले. १२५ विद्यार्थ्यांनी रँक मिळवली असून, त्यांना ३९ सुवर्णपदके आणि २८ जणांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
समारंभाला राज्याचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम.सी. सुधाकर आणि इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मश्री ए.एस. किरणकुमार यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी.एम. त्यागराज यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


