बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील गोवावेस -श्री बसवेश्वर सर्कल येथील सिग्नल यंत्रणेसह सर्कलची सुधारणा, सुशोभीकरण करावे या मागणी संदर्भातील बेळगाव लाईव्हने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेण्यात आली असून पीव्हीजी कंपनीने रहदारी पोलिसांच्या सहकार्याने या कामी पुढाकार घेतला. त्यामुळे लवकरच सुशोभीकरणाच्या कामाला प्रारंभ होईल, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी दिली.
पीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी, रहदारी पोलीस अधिकाऱ्यांनी आज बुधवारी सकाळी गोवावेस -श्री बसवेश्वर सर्कलला भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी माजी नगरसेवक गुंजाटकर प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. गोवावेस सर्कल येथील सिग्नल यंत्रणेमुळे वाहन चालकांचा गोंधळ होत आहे. त्यामुळे येथील सिग्नल यंत्रणेसह सर्कलची सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी गेल्या बुधवारी एका निवेदनाद्वारे महापौर मंगेश पवार व उपमहापौर वाणी जोशी यांच्याकडे केली होती.
राणी चन्नम्मा चौकात जशी सिग्नल व्यवस्था करण्यात आली आहे, त्याप्रमाणे गोवावेस सर्कल येथे व्यवस्था करावी व त्याचे नियोजन करावे असा प्रस्तावही त्यांनी मांडला होता. या संदर्भात बेळगाव लाईव्हने वृत्त प्रसिद्ध करण्याबरोबरच गोवावेस सर्कल येथील समस्या मांडली होती. त्याची दखल घेऊन पीव्हीजी कंपनीचे मालक प्रसन्ना घोटगे यांनी माजी नगरसेवक गुंजटकर यांच्याशी संपर्क साधून आपल्या कंपनीकडून गोवावेस सर्कलचे सौंदर्यीकरण करण्याची इच्छा प्रकट केली आहे.
त्या अनुषंगाने कंपनीचे चेअरमन अन्य अधिकारी, रहदारी पोलीस अधिकारी, स्वतः माजी नगरसेवक विनायक गुंजटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुधारणेच्या दृष्टिकोनातून आज सकाळी गोवावेस सर्कलची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत सिग्नल यंत्रणा दुरुस्त करणारे तंत्रज्ञ देखील उपस्थित होते. यावेळी सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक दोष दूर करण्याबरोबरच सर्कलचे उत्तम प्रकारे सुशोभीकरण करण्याचे आश्वासन पीव्हीजी कंपनी व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिले.
याप्रसंगी बोलताना माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी गोवावेस सर्कलच्या समस्येबद्दल बेळगाव लाईव्हसह अन्य प्रसिद्धी माध्यमातून आवाज उठवण्यात आला होता. त्याचप्रमाणे गोवावेसच्या श्री बसवेश्वर सर्कल येथे बरेच अपघात घडतात त्यामुळे या सर्कलचा विकास केला जावा अशा मागणीचे निवेदन आम्ही जनतेच्यावतीने महापौरांना दिले होते. यापूर्वी पीव्हीजी कंपनीने या सर्कलचे सुशोभीकरण केले असले तरी या ठिकाणच्या कारंजाचे तसेच हायमास्ट दिव्याचे कनेक्शन तोडण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची या ठिकाणी कमतरता भासत आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्धी माध्यमांमध्ये येताच पीव्हीजी कंपनीचे मालक प्रसन्न घोटगे यांनी तात्काळ माझ्याशी संपर्क साधला. तसेच सदर सर्कल तुम्हाला कशा पद्धतीने सुशोभित करून हवा त्याचा आराखडा आम्हाला द्या त्यानुसार आम्ही गोवावेस सर्कलचा विकास करून देऊ, असे ठोस आश्वासन दिले आहे. ते स्वतः सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक असल्यामुळे त्यांना अशा समाजोपयोगी कार्यांमध्ये खूप रस आहे.
रहदारी पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित असून त्यांनी या सर्कलच्या सिग्नलचे तंत्रज्ञ देखील आपल्या सोबत आणले आहेत. या तंत्रज्ञ मंडळींनी गोवावेस सर्कल येथील सिग्नल नेमके कसे असायला हवेत? याचे एक डिझाईन तयार केले आहे असे सांगून त्यामुळे सिग्नल व्यवस्थित करण्याबरोबरच नव्या आराखड्यानुसार लवकरात लवकर या सर्कलच्या सौंदर्यकरणाच्या कामाला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक गुंजटकर यांनी दिली. एकंदर गोवावेस -श्री बसवेश्वर सर्कलचा पुन्हा कायापालट होणार असल्यामुळे नागरिक, वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


