बेळगाव लाईव्ह :बेनकनहळ्ळी (ता. जि. बेळगाव) गावाच्या हद्दीतील एका खुल्या जागेत सुरू असलेल्या अंदर-बाहर जुगारी अड्ड्यावर काल मध्यरात्री बेळगाव ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून 10 जुगाऱ्यांना अटक केली. तसेच त्यांच्या जवळील रोख 53 हजार 600 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये संतोष परमार (रा. नानावाडी बेळगाव), सुरेश परशुराम अनगोळकर (रा. पाटील गल्ली बेळगाव), बाबू रामाप्पा दोडमणी (रा. मार्केट चौधरी गेट, दांडेली जि. कारवार), बसवराज भीमराव शिगीहळ्ळी (रा. ज्योतिर्लिंग गल्ली, कणबर्गी बेळगाव), हिदायतुल्ला असीम मकानदार (रा. आंबेडकर गल्ली, चंदगड -महाराष्ट्र), आनंद भरमकुमार कस्तुरी (रा. रविवार पेठ, गोकाक जि. बेळगाव), तौफिक मोहम्मदगौस वाकीर (रा. सुभाषनगर अब्बास गल्ली, दांडेली जि. कारवार), अलिसाब अन्वर मसनकट्टी (रा. मारुतीनगर, दांडेली जि. कारवार), मलिक निजामसाब गुडावले (रा. रविवार पेठ, गोकाक जि. बेळगाव) आणि तवणप्पा पद्मप्पा बेंन्नाळी (रा. रविवार पेठ गोकाक जि. बेळगाव) यांचा समावेश आहे.
बेनकनहळ्ळी गावाच्या हद्दीतील एका खुल्या जागेत अंदर-बाहर जुगाराचा अड्डा रंगल्याची खात्रीलायक माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवाई यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने काल मध्यरात्री 3:30 वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी अचानक धाड टाकली.
तसेच जुगारात रंगलेल्या उपरोक्त दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील रोख 53 हजार 600 रुपये आणि जुगारासाठी वापरण्यात येत असलेले पत्ते व संबंधित अन्य साहित्य जप्त केले. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
दोघे मटका बुकी मार्केट पोलिसांच्या ताब्यात
बेळगाव शहरातील जुन्या भाजी मार्केट शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये मटक्याचे आकडे घेणाऱ्या दोघा मटका बुकिंना मार्केट पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळील 3,240 रुपये रोख आणि मटक्याचे साहित्य जप्त केले.
पोलिसांनी अटक केलेल्या मटका बुकिंची नावे गजानन शशिकांत गरडे (वय 48, कामत गल्ली बेळगाव) आणि किशोर गजानन सावंत (वय 29, शिवाजीनगर, पाचवा क्रॉस बेळगाव) अशी आहेत. हे दोघे आज मंगळवारी जुन्या भाजी मार्केट शेजारील एका पत्राच्या शेडमध्ये कल्याण -मुंबई ओसी मटक्याचे आकडे घेत असल्याची माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हवन्नवर त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकून दोघांनाही ताब्यात घेतले.
तसेच त्यांच्याकडील रोख 3240 रुपये आणि मटक्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.





