बेळगाव लाईव्ह :शहापूर पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील जुने बेळगाव राष्ट्रीय महामार्गाजवळ सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या अंदर-बाहर जुगारी अड्ड्यावर छापा टाकून शहापूर पोलिसांनी 5 जुगाऱ्यांना अटक केली. तसेच त्यांच्याजवळील 8,150 रुपये जप्त केले.
हमीद इनुशा कागजी (वय 44, रा. होसूर तंबीटकर गल्ली, शहापूर बेळगाव), मोशीन अब्दुल खादर सदरसोभा (वय 24, रा. पाटील गल्ली, खासबाग बेळगाव), उमेश कल्लाप्पा खन्नूकर (वय 34, विष्णू गल्ली वडगाव, बेळगाव), राहुल बाबू होसुरकर (वय 30, लक्ष्मी गल्ली, जुने बेळगाव) आणि उत्तम मनोहर भराठी (वय 35, रा. महावीरनगर, कपिलेश्वर कॉलनी बेळगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण जुने बेळगाव राष्ट्रीय महामार्गाजवळ सार्वजनिक ठिकाणी पत्त्यांवर पैसे लावून अंदर-बाहर जुगार खेळत होते. याबाबतची माहिती मिळताच शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक एस. एन. बसपा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धाड टाकून उपरोक्त सर्वांना अटक केली. तसेच त्यांच्या जवळील रोख 8,150 रुपयांसह पत्ते वगैरे जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
सीसीबी पोलिसांकडून मटका बुकिला अटक; 10,080 रु. जप्त
बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराच्या येडीयुरप्पा मार्गावरील दत्तप्रसाद धाब्याशेजारील खुल्या जागेत लोकांकडून पैसे घेऊन मटका अड्डा चालवणाऱ्या एका मटका बुकिला बेळगाव सीसीबी पोलिसांनी अटक करून त्याच्याकडील रोख 10,080 रुपये व मटक्याचे साहित्य जप्त केले.
सीसीबी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव राहुल मनोहर हलगेकर (वय 44, उप्पार गल्ली, खासबाग बेळगाव) असे आहे. राहुल हा येडीयुरप्पा मार्गावर उत्तर दिशेला असणाऱ्या दत्तप्रसाद धाब्या शेजारील खुल्या जागेत लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका नामक मटक्याचा अड्डा चालवत होता.
याबाबतची माहिती मिळताच बेळगाव सीसीबी विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बी. भजंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून आरोपीला ताब्यात घेतले तसेच त्याच्या जवळील एकूण रोख 10,080 रुपये आणि मटक्याच्या चिठ्ठ्या वगैरे साहित्य जप्त केले याप्रकरणी सीसीबी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.


