बेळगाव लाईव्ह विशेष : खानापूर तालुक्यात वन्य जीवींशी निगडित सोमवारी दोन घटना घडल्या माचीगड (बिजगर्णी) गावात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अस्वलाचा वावर दिसल्याने गावकऱ्यांमध्ये सध्या भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण आहेतर दुसरीकडे हलसाळ या गावात गेल्या दोन दिवसांपासून आठ हत्तींच्या कळपाने थैमान घातले असून, गावातील शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील आठवड्यात याच तालुक्यात हत्तींच्या दुर्दैवी मृत्यूनंतर, आणि त्याआधी शेतकऱ्यावर झालेल्या अस्वलाच्या हल्ल्यानंतर, आता थेट गावाच्या मध्यवस्तीत वन्यजीवांची उपस्थिती हा केवळ एक प्रसंग राहिलेला नाही. ही सतत वाढत जाणारी आणि गंभीर होत चाललेली एक समस्या आहे, जी मानवी वस्ती आणि जंगलाच्या नात्यातील तुटलेली कडी स्पष्ट करते.
खानापूर तालुका वनसंपन्न असला तरी, आज या वनाची सुरक्षितता, संतुलन आणि आरोग्य झपाट्याने ढासळू लागले आहे. जंगलातील अन्नसाखळी बिघडते तेव्हा प्राणी पर्यायी अन्न आणि पाण्याच्या शोधात बाहेर पडतात. याचे मुख्य कारण म्हणजे जंगलातील पाण्याचे तुटलेले झरे, अवैध वृक्षतोड, मानवी अतिक्रमण आणि जंगलाच्या कडांचे क्षरण. या सर्व मानवनिर्मित समस्यांमुळे वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर ढकलले जात आहे.
आज परिस्थिती अशी आहे की, शेतकरी एकीकडे आपल्या पिकांचे रक्षण करतो आणि दुसरीकडे वन्यजीवांचा हल्ला सहन करतो. गावकरी दररोज अनिश्चिततेच्या धसक्याखाली जगतात. तर वन्यजीव, जे जंगलाचे मालक आहेत, ते भटकत आहेत, ज्या भूमीने त्यांना कधी बोलावलेच नव्हते. ही दोन्ही बाजूंची मोठी शोकांतिका आहे. एका बाजूला शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, जीवंत धोक्याची सावली आणि भीती आहे, तर दुसऱ्या बाजूला जंगलातून विस्थापित झालेल्या प्राण्यांचे गोंधळलेले आणि धोकादायक वाटचाल दिसत आहे.

या संपूर्ण परिस्थितीचे मूळ कारण कोण समजून घेणार आणि उपाययोजना कोण करणार, हा मूलभूत प्रश्न आता उभा राहिला आहे. याचे उत्तर स्पष्ट आहे: वन विभाग. केवळ गस्त लावून किंवा लोकांना सावध करून ही समस्या सुटणार नाही. या गंभीर स्थितीवर संशोधन, प्रभावी नियोजन आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणीची गरज आहे.
यासाठी वन्यजीव आणि मानवामधील संघर्ष कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी जंगलातील पाण्याच्या स्त्रोतांचे पुनरुज्जीवन करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून प्राणी अन्न-पाण्यासाठी मानवी वस्तीत येणार नाहीत. तसेच, अन्नसाखळी संतुलनासाठी आणि वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात थांबवून ठेवण्यासाठी पर्यावरणीय पुनर्संचयन करणे गरजेचे आहे. यासोबतच, गाव आणि शेती परिसराच्या बाजूला सुरक्षित आणि नैसर्गिक वन्यजीव बफर झोन निर्माण करणे, तसेच वन्यजीव संचार क्षेत्रांचे अचूक मॅपिंग करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने त्यांचे सतत मोनिटरिंग करणे अत्यावश्यक आहे. या तांत्रिक उपायांबरोबरच, गावांमध्ये वन्यजीव व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम राबवणे आणि शेतजमिनीत वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक शेती तारांचे नियंत्रित वापर व नियमबद्धता सुनिश्चित करणे या सर्व उपाययोजनांची त्वरित आणि सातत्याने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
समस्या केवळ अस्वल गावात शिरले इतकी लहान नाही. समस्या आहे मनुष्य आणि जंगल यांच्यातील दिवसेंदिवस तुटत चाललेल्या नात्याची. जंगल जर स्वच्छ, सुरक्षित आणि सशक्त राहिले, तर वन्यजीव गावात येणारच नाहीत, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. माचीगडमध्ये आज दिसत असलेली अस्वलाची पाऊलखूण ही आपल्याला केवळ भीती देण्यासाठी नाही आली, ती आली आहे गंभीर इशारा देण्यासाठी. हा इशारा असा आहे की, आता वनसंवर्धन हे केवळ धोरण नसून आपल्या अस्तित्वाचा आणि जगण्याचा थेट जिवंत प्रश्न आहे.
वन विभाग, स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि स्वयंस्फूर्त संस्था यांनी एकत्रित येऊन सहजीवनाचा नवा मार्ग तातडीने आखला पाहिजे. अन्यथा, उद्या आपण केवळ घटनांची नोंद करू, हल्ले मोजू आणि जीवांची शोककथा लिहीत राहू. आज निर्णय घेण्याची वेळ आहे, कारण जंगल वाचवणे म्हणजेच गाव वाचवणे हे अंतिम सत्य आहे.


