बेळगाव लाईव्ह : बालदिनाचे औचित्य साधून बेळगावातील मराठा मंडळ परिसरात आज खाऊ कट्टा या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मराठा मंडळ हायस्कूल, जिजामाता हायस्कूल आणि मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल या तिन्ही शाळांनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी केला. केवळ अभ्यासक्रमाचे ज्ञान न देता, विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे आणि ‘कसे कमवायचे’ याचे प्रात्यक्षिक समजावे, हा यामागील मुख्य उद्देश होता.
खाद्यपदार्थ कसे तयार करावेत आणि त्यांची विक्री कशी करावी, या विषयावर आज शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात हा खाऊ कट्टा भरवला होता. गेली चार वर्षांपासून हा उपक्रम यशस्वीरित्या सुरू आहे. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहारांचे ज्ञान मिळावे, या अनुषंगाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी अत्यंत हिरीरीने आणि उत्साहाने सहभाग घेतला. मुलांनी गॅसचा वापर न करता तयार करता येणाऱ्या अनेकविध पदार्थांचे स्टॉल्स उभारले होते.
विद्यार्थ्यांनी या स्टॉल्सच्या माध्यमातून केवळ खाद्यपदार्थ बनवण्याचेच नाही, तर त्यांची किंमत ठरवून विक्री करण्याचे आणि ग्राहकांशी संवाद साधण्याचे व्यवहार कौशल्यही आत्मसात केले. या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांसह, मराठा मंडळ महाविद्यालयाच्या विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.





