बेळगाव लाईव्ह : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागल्यानंतर, शेतकऱ्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. हत्तरगी टोलनाक्याजवळ झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर, सरकारने त्वरित ऊस दराबाबत निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी बंदची हाक देण्यात येईल, तसेच राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असे शेतकरी नेते चुन्नप्पा पुजारी यांनी स्पष्ट केले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून आज हत्तरगी टोलनाक्याजवळ तुफान दगडफेक करण्यात आली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शेतकरी नेते चुन्नप्पा पुजारी म्हणाले की, ही दगडफेक स्वखुशीने करण्यात आलेली नाही. सरकारकडून अद्याप कोणताही निर्णय न आल्याने शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत.
सरकारकडून लवकर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी तात्पुरती आंदोलनाची तीव्रता कमी करण्यात आली होती.
गुर्लापूर येथे सर्व शेतकरी एकत्रित आले असताना विविध ठिकाणची आंदोलने पोलिसांकडून दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, संतप्त शेतकरी आणि आंदोलकांनी दगडफेक केली असून, कोणत्याही अनुचित प्रकाराला सरकारच जबाबदार असेल.
“सरकारने त्वरित ऊस दराबाबत निर्णय घ्यावा; अन्यथा राज्यव्यापी बंदची हाक देण्यात येईल, तसेच राष्ट्रीय महामार्ग देखील रोखून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा निर्वाणीचा इशारा चुन्नप्पा पुजारी यांनी दिला.





