बेळगाव लाईव्ह :नंदगड खानापूर तालुक्यातील नंदगड येथे वयोवृद्ध माजी सैनिकावर पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तीव्र संतापाची लाट उसळली आहे. हेल्मेट नसल्याच्या कारणावरून थांबवलेल्या माजी सैनिकाला 4–5 पोलिसांनी बूटांनी मारहाण करत जबरदस्तीने पोलीस स्थानकात ओढत नेत असल्याचे दृश्य व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांसोबतच माजी सैनिक समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
या प्रकाराचा माजी सैनिक संघटनेने तीव्र निषेध व्यक्त करत आज मोठ्या संख्येने नंदगड पोलीस स्थानकावर धडक दिली. बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच नंदगड परिसरातील शेकडो माजी सैनिकांनी संतप्त मोर्चा काढत पोलीस स्थानकाला घेराव घातला.
“वयोवृद्ध माजी सैनिकावर केलेला अत्याचार म्हणजे संपूर्ण माजी सैनिक समाजाचा अपमान आहे. जबाबदार पोलिसांवर तत्काळ निलंबनासह कठोर कार्रवाई झालीच पाहिजे,” अशी ठाम मागणी यावेळी संघटनेने पोलिस प्रशासनाकडे केली. तसेच, “यापुढे कोणत्याही माजी सैनिकाला हात लावल्यास संघटना गप्प बसणार नाही,” असा कठोर इशाराही देण्यात आला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे ही घटना राज्यभर चर्चेचा विषय बनली असून कर्नाटकातील सर्व 26 जिल्ह्यांत या प्रकरणाचा निषेध नोंदवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती संघटनेच्या नेत्यांनी दिली. आवश्यक असल्यास व्यापक आंदोलन उभारले जाईल, असेही ते म्हणाले.
या घटनेने पोलिसांच्या वर्तनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून नागरिकांसह माजी सैनिक समाजाने प्रशासनाकडून त्वरीत, निष्पक्ष चौकशी व कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. नंदगड पोलीस स्थानकाचे पीआय व पीएसआय यांनी मोर्चादरम्यान उपस्थित राहून संघटनेचे निवेदन स्वीकारले.


