बेळगाव लाईव्ह : मानवजातीवर ओढवलेल्या जागतिक तापमानवाढ आणि प्रदूषण यांसारख्या भीषण संकटातून बाहेर पडायचे असेल, तर मोठ्या प्रमाणात वनीकरण झाले पाहिजे. तसेच काळाची गरज लक्षात घेऊन “असेल ते झाड जगवू आणि नव्याने झाडे लावून ती जगवण्याचा प्रयत्न करू” अशी प्रतिज्ञा आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असे विचार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवाजी कागणीकर यांनी व्यक्त केले.
बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाचा 14 वा पदवीदान सोहळा आज मंगळवारी सकाळी सुवर्ण विधानसौध येथे दिमाखात पार पडला. याप्रसंगी पर्यावरण व ग्रामीण विकासातील प्रेरणादायक कार्यासाठी शिवाजी कागणीकर यांना राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या पदवीदान सोहळ्यानंतर डॉ. कागणीकर बेळगाव लाईव्हशी बोलत होते.
ते म्हणाले की, सध्या प्रदूषणाची जी गंभीर समस्या निर्माण झाली आहे, त्याला वृक्षांचा ऱ्हास कारणीभूत आहे. पर्यावरण सुरक्षित ठेवायचे असल्यास 100 एकर जमिनीपैकी 30 एकर जमिनीवर वृक्ष असले पाहिजेत, असे शास्त्रज्ञ सांगतात. आज भारत सरकार सांगते की हे प्रमाण आपल्या देशामध्ये आता 11 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. मग उरलेली 20 टक्के झाडे गेली कुठे? अलीकडच्या जागतिक तापमानवाढीचे मुख्य कारण पृथ्वीवरील वनीकरण नष्ट होत आहे हेच आहे. झाडे नाहीशी झाली तर जगाचे तापमान वाढणारच.
ते पुढे म्हणाले की, जागतिक तापमान सुरक्षित ठेवायचे असल्यास झाडे राहिली पाहिजेत, कारण झाडे वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेतात आणि प्राणवायू देतात. झाडे नष्ट होत असल्यामुळे हवा, पाणी, माती आणि आपले अन्नदेखील प्रदूषित होत आहे. आरोग्यपूर्ण जीवन जगायचे असेल तर वातावरणात शुद्ध प्राणवायू असला पाहिजे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात वनीकरण झाले पाहिजे. प्रदूषणाचे गंभीर संकट लक्षात घेता “असेल ते झाड जगवू आणि नव्याने झाडे लावून ती जगवण्याचा प्रयत्न करू” अशी प्रतिज्ञा आपण सर्वांनी घेतली पाहिजे, तरच जागतिक तापमानवाढ व प्रदूषण या भीषण संकटातून आपण बाहेर पडू शकू.
डॉ. कागणीकर पुढे म्हणाले की, मी आज समाधानी नाही. याचे कारण म्हणजे देशात स्वराज्य येऊन 75–76 वर्षे झाली. त्यानंतर स्वराज्याचे सुराज्य करण्याचे ठरवले असले तरी तसे घडताना दिसत नाही. आज आपल्या देशामध्ये 100 पैकी 41 टक्के लोक शिकलेले असून वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करत आहेत. तथापि आज भ्रष्टाचाराला शिष्टाचार म्हणून डोक्यावर घेऊन मिरवले जात आहे. हे पाहता आपला देश साक्षरांचा देश होण्यापेक्षा निरक्षरांचा देश म्हणून जगात वावरला असता, तर आम्हाला अभिमान वाटला असता, असे दुःखाने म्हणावेसे वाटते.
ते पुढे म्हणाले की, आज आपल्या देशातील 70 टक्के लोक ग्रामीण भागातील आहेत. त्यामध्ये जवळपास 60 टक्के लोक शेतकरी व शेतमजूर असून ते आपल्याला देशाला अन्न पुरवतात. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न अद्याप मिटलेले नाहीत. शेतीतून त्यांचा उत्पादन खर्चदेखील निघत नाही. त्यामुळे कृषी उत्पादनांना किमान आधारभूत किंमत द्यावी, अशी त्यांची अनेक वर्षांपासून मागणी असली तरी त्याची अद्याप दखल घेतली गेलेली नाही.
आज आपण पर्यावरण प्रदूषणाच्या फार मोठ्या संकटाला तोंड देत आहोत. हवा, पाणी, माती, आहार हे सर्व प्रदूषित होत आहे. आजचा मानवदेखील प्रदूषित झाला आहे. मानव आपली भारतीय संस्कृती विसरून पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करू लागला आहे. त्यामुळे आपल्या देशाचे भविष्य चांगले आहे, असे मला वाटत नाही, हे खेदाने सांगावेसे वाटते, असे डॉ. शिवाजी कागणीकर शेवटी म्हणाले.


