बेळगाव लाईव्ह : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मराठी विद्यानिकेतन शाळेच्या सभागृहात महाराष्ट्रातील प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्यासोबत ‘गप्पा-टप्पा’ या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बेळगाव शाखा आणि प्रगतिशील लेखक संघ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने झाला.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित कार्यकर्त्यांनी ओळखपरिचयाने झाली. त्यानंतर अंनिस बेळगाव शाखेचे सचिव जोतिबा अगसीमनी यांनी हेरंब कुलकर्णी यांचे स्वागत केले.
यावेळी विविध सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवर खुल्या मनाने चर्चा झाली. प्रामुख्याने एकल पालक कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क माफ करणे, शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे यासंदर्भात विचार विनिमय झाला. मुलांवर चांगले संस्कार कसे करावे, त्यांना व्यसनापासून कसे दूर ठेवावे आणि मुले स्वावलंबी कशी बनतील यावरही मतमंथन करण्यात आले. महिलांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्नावर देखील विचार मांडण्यात आला.
महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या साहित्याचा अभ्यास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळांमध्ये व्याख्यानमाला आयोजित करण्याचा प्रस्ताव चर्चेत आला. मुलांचे प्रबोधन होण्यासाठी महाराष्ट्रातील प्रगत विचारांचे मूल्य शिक्षणात समाविष्ट करण्यावरही भर देण्यात आला.
या कार्यक्रमात कॉ. नागेश सातेरी, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, एस. पी. चौगुले, सूर्याजी पाटील, जोतिबा अगसीमनी, शिवाजी हसनेकर, मधू पाटील, गौरी ओऊळकर, नीला आपटे, लता पावशे समेत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



