बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथील राणी चन्नम्मा मिनी प्राणिसंग्रहालयातील ३१ काळविटांचा मृत्यू हॅमरेजिक सेप्टीसीमिया (HS) या जीवाणूजन्य आजारामुळे झाल्याची पुष्टी बुधवारी प्राप्त झालेल्या IAHVB-DBM या संस्थेच्या प्रयोगशाळा अहवालातून झाली असल्याची माहिती उपवनसंरक्षक (DCF) एन. ई. क्रांती यांनी दिली.
बुधवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत क्रांती म्हणाले, “पहिल्या आठ काळविटांचा मृत्यू झाल्याबरोबर आम्ही तात्काळ पशुवैद्यकीय तज्ज्ञ आणि प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्कात राहिलो. तज्ज्ञांनी शवविच्छेदनावरून हा जीवाणूजन्य संसर्ग असल्याचा संशय व्यक्त केला आणि त्यानुसार जैविक नमुने तपासणीसाठी पाठवले. लक्षणे दिसताच आम्ही खबरदारीची पावले उचलली.”
ते पुढे म्हणाले, “हीच HS आजाराची बाधा प्रथम वडोदऱ्यात आढळली होती. त्यामुळे म्हैसूर व बेंगळुरूतील तज्ज्ञांसह वडोदरा येथील वनअधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. आम्ही राबवित असलेल्या उपाययोजना योग्य असल्याचे त्यांच्याकडूनही सांगण्यात आले.”
DCF क्रांती यांनी सांगितले की, रोग इतर शाकाहारी प्राण्यांमध्ये किंवा आसपासच्या गावांमध्ये पसरू नये म्हणून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उरलेली काळविटे पशुवैद्यांच्या सल्ल्यानुसार सुरक्षित झोनमध्ये हलवली असून त्यांची प्रकृती ठीक आहे व ते नियमित अन्नही घेत आहेत. त्यांच्या प्रतिकारशक्तीसाठी ‘इम्युनिटी बूस्टर’ही दिले जात आहे.HS उद्रेकाच्या कारणावर बोलताना त्यांनी सांगितले, “अनुकूल हवामानिक परिस्थितीमध्ये अशा संसर्गांचा प्रसार होऊ शकतो. आम्ही NIVEDI च्या अहवालाची जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करीत आहोत.”काळविटे व हरणांचे लसीकरण कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “हे प्राणी अतिशय संवेदनशील असतात; पकडण्याचा प्रयत्न केला तरी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते,” असे ते म्हणाले.
सध्या प्राणिसंग्रहालय कर्मचाऱ्यांचे क्वारंटाईन, स्वच्छता, सुरक्षित अंतर, इतर प्राण्यांना इम्युनिटी बूस्टर, वाहनांचे निर्जंतुकीकरण अशा उपाययोजना राबविल्या जात आहेत. शाकाहारी प्राण्यांच्या दालनात पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही.
आसपासच्या गावांतील पाळीव जनावरांना संसर्ग फैलावू नये म्हणून पशुसंवर्धन विभागालाही अलर्ट करण्यात आले आहे.
प्राणिसंग्रहालय प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आरोप DCF यांनी फेटाळले असून, “या काळात आरोग्य सल्लागार समितीची बैठक झाली नाही, ही गोष्ट आम्ही मान्य करतो,” असे ते म्हणाले.
बेळगाव प्राणी संग्रहालयासाठी केवळ एक पशुवैद्य आहे मात्र पालकमंत्र्यांनी यासाठी 15 पशुवैद्यांची गरज असल्याची शिफारस सरकारकडे केली आहे आणि सरकारकडून त्याची पूर्तता आले आहे अशी माहिती त्यांनी दिली.




