बेळगाव लाईव्ह : अलिकडेच पात्र वैद्यकीय कर्मचाऱ्यांशिवाय चालणाऱ्या एका परवाना नसलेला क्लिनिकवर छापा टाकल्यानंतर जिल्हा प्रशासनाने बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या स्किन केअर क्लिनिक्स विरुद्धची कारवाई तीव्र केली आहे. क्लिनिकच्या संचालकांना बेळगावचे जिल्हाधिकारी (डीसी) मोहम्मद रोशन यांच्या कार्यालयात उल्लंघनांच्या चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
चौकशीदरम्यान, सरकारी नियमांचे पालन न करता आणि आवश्यक परवानग्या न घेता कोणतेही क्लिनिक किंवा उपचार केंद्र चालवू दिले जाणार नाही. योग्य परवान्याशिवाय सुरू केलेल्या कोणत्याही क्लिनिकवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा जिल्हाधिकारी रोशन यांनी दिला.
आरोग्य विभाग, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने अलीकडेच शहरातील अनधिकृत स्किन केअर क्लिनिकवर लक्ष ठेवून प्रभावी अशी संयुक्त कारवाई केली. सदर कारवाईमध्ये 15 हून अधिक स्किन केअर क्लिनिक्स बेकायदेशीर असल्याचे उघडकीस आले. यापैकी बहुतांश क्लिनिक्समध्ये कर्नाटक खाजगी वैद्यकीय प्रतिष्ठान (केपीएमई) कायद्याअंतर्गत पात्र डॉक्टर किंवा वैध परवाने नसतानाही त्वचेचे उपचार दिले जात होते.
तसेच बेकायदा औषधेही दिली जात होती. कारवाईदरम्यान या क्लिनिक्समध्ये वैद्यकीय प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या पदवी नसतानाही अनेक क्लिनिक त्वचेच्या आजारांवर उपचार केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी उघडकीस आणले. काही प्रकरणांमध्ये योग्य परवानगीशिवाय औषधे थेट रुग्णांना दिली जात होती.
छाप्यांनंतर जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या प्रत्येक कारवाईचा सविस्तर आढावा घेतला. चौकशीदरम्यान कारवाईत सहभागी आरोग्य विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. सार्वजनिक सुरक्षेसाठी प्रशासनाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी वैद्यकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या क्लिनिकवर कठोर कारवाई सुरूच राहील यावर भर दिला. “परवानगीशिवाय काम करणे केवळ कायदा मोडत नाही तर रुग्णांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण करते,” असे ते म्हणाले. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना उपचार घेण्यापूर्वी क्लिनिकची ओळखपत्रे आणि परवाने पडताळण्याचे आवाहन केले आहे.





