मराठा सेंटर येथे अग्निविरांची क्रॉस कंट्री शर्यत ; भगवान काळे विजेता

0
8
 belgaum

बेळगाव लाईव्ह :मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमएलआयआरसी), बेळगावतर्फ अग्निवीरांच्या 6/25 बॅचसाठी आयोजित क्रॉस कंट्री शर्यत आज शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडली. सदर शर्यतीचे विजेतेपद वैयक्तिक गटात रिक्रूट भगवान सीताराम काळे याने पटकाविले. सांघिक कामगिरीत बुर्की कंपनी विजेती ठरली.

सहनशक्तीच्या सर्वात कठीण परीक्षा घेणाऱ्या क्रीडा प्रकारांपैकी एक असलेली ही क्रॉसकंट्री शर्यत तरुण अग्निवीरांमध्ये मानसिक लवचिकता, शारीरिक बळकटता आणि ध्येयासाठी आवश्यक तंदुरुस्ती विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. आज आयोजित या शर्यतीमध्ये 408 अग्निवीरांच्या उत्साही सहभागाने त्यांचा दृढनिश्चय आणि रेजिमेंटल सेंटरमध्ये लावण्यात आलेली चांगली सवय आणि प्रशिक्षणाचा उच्च दर्जा प्रतिबिंबित झाला.

मराठा सेंटर येथील शिवाजी स्टेडियमवर एमएलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते आज सकाळी ध्वज दाखवून या शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले. सदर 10.8 कि.मी. अंतराच्या या क्रॉसकंट्री धावण्याच्या शर्यतीमध्ये एमएलआयआरसी, आरएमएस सर्कल, कमांडो विंग, अंगडी कॉलेज, मंडोळी रोड आणि नानावाडी येथील बॅफल रेंज यासारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश होता. शर्यतीची माघारी पुन्हा शिवाजी स्टेडियमवर सांगता झाली. एक प्रकारे अग्निविरांची सहनशक्ती, तग धरण्याची क्षमता आणि इच्छाशक्तीची चांचणी या शर्यतीच्या माध्यमातून घेतली गेली.

 belgaum

समारोप समारंभात ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी विजेत्यांना ट्रॉफी आणि पदके प्रदान केली. क्रॉस कंट्री शर्यतीमध्ये सांघिक विभागात बुर्की कंपनीने विजेतेपदाचा करंडक पटकावला. सौदी कंपनीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

वैयक्तिक गटात रिक्रूट भगवान सीताराम काळे याने 38 मिनिटे 30 सेकंदांच्या प्रभावी वेळेसह शर्यतीत प्रथम येत सुवर्णपदक हस्तगत केले. त्याच्या मागोमाग रिक्रूट ओंकार अनिल पोवार (रौप्य) आणि रिक्रूट श्रीराम पांडुरंग वेकुले (कांस्य) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. पारितोषिक वितरण समारंभात एकूण 10 अग्निवीरांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.

या शर्यतीमुळे बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर या लष्करी केंद्राची कठोर शारीरिक प्रशिक्षणाप्रती असलेली वचनबद्धता बळकट झाली. त्याचबरोबर अग्निवीरांमध्ये सौहार्द, स्पर्धात्मक भावना आणि उत्कृष्टतेची नीतिमत्ताही बळकट झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.