बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालय-१ ने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ आणि विनयभंग केल्याच्या आरोपाखाली एका आरोपीला ५ वर्षांची कठोर शिक्षा सुनावली आहे.
रायबाग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या सुनावणीनंतर न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. आरोपी अनिल सुभाष कांबळे (वय २६, रा. जलालपूर, ता. रायबाग, जि. बेळगाव) याला ही शिक्षा ठोठावण्यात आली असून, पीडित मुलीला जिल्हा विधी प्राधिकरणाकडून एक लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
पीडित अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी रायबाग पोलीस ठाण्यात पोक्सो अधिनियमानुसार दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी हा निकाल सुनावण्यात आला आहे. तपास अधिकारी ऐश्वर्या नागराळ यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, विशेष शीघ्रगती पोक्सो न्यायालय-०१, बेळगाव येथे दोषारोपपत्र सादर केले.
न्या. श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी एकूण ६ साक्षीदार आणि ३० कागदपत्रांच्या आधारावरून आरोपीवरील आरोप सिद्ध झाल्याचा निर्णय दिला. न्यायालयाने आरोपीला ५ वर्षांच्या कठोर कारागृहाची शिक्षा आणि ५,००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
तसेच, पीडित मुलीला जिल्हा विधी प्राधिकरणाकडून एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आणि ही रक्कम ५ वर्षांसाठी राष्ट्रीयीकृत बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी या प्रकरणात युक्तिवाद केला.



