बेळगाव लाईव्ह : “मुख्यमंत्री काय विचार करतात, मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही… या विषयावर मी यापूर्वी खूप बोललो आहे. आता पुढे मी यावर अजिबात भाष्य करणार नाही,” असे स्पष्ट विधान गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी आज केले.
बेळगाव विमानतळावर बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विविध संघटना मोठ्या प्रमाणात आंदोलनांना उतरू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याबाबत प्रशासनाशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनं शांततेत आणि लोकशाही मार्गाने पार पडावीत, कायदा-सुव्यवस्थेला धक्का लागू नये, यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. आंदोलनांसाठी वेळ, ठिकाण आणि आवश्यक मार्गदर्शन निश्चित करण्याबाबतही अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये चर्चा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेस आमदार विश्वास वैद्य, काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.



