Saturday, December 6, 2025

/

बनावट कॉल सेंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात नुकत्याच उघडकीस आलेल्या बनावट कॉल सेंटर प्रकरणाचा तपास आता सीआयडी बंगळुरू यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. बेळगाव पोलिसांनी अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे मिळवत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. मात्र, या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय स्वरूप आणि त्यासाठी आवश्यक असलेली उच्चस्तरीय तांत्रिक व मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सायबर गुन्हे पोलीस स्टेशन, बेळगाव शहर येथे एका निनावी पत्राच्या आधारावर सहायक उपनिरीक्षक एल. एस. अनगुंडी यांनी दिलेल्या माहितीवरून गुन्हा क्रमांक ५०/२०२५, कलम ४१९, ४२०, ४६५ सह ६६ (डी) आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर तपास सुरू झाला.

पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, पोलीस निरीक्षक यू. एस. अवळू आणि निरीक्षक रघु जे. एन. यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेळगावमधील आझम नगर सर्कलजवळ असलेल्या कुमार हॉलवर छापा टाकला. येथे अनधिकृतपणे कॉल सेंटर चालवणाऱ्या एकूण ३० आरोपींना ताब्यात घेऊन तपास करण्यात आला.

 belgaum

या कारवाईदरम्यान, आरोपींकडून ३७ लॅपटॉप (अंदाजित किंमत रु. ६,५०,०००/-), ३८ मोबाईल (रु. १,५०,०००/-) आणि रु. १०,०००/- रोख रक्कम जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांपैकी २८ आरोपींना दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तपास पुढे नेत असताना, या गुन्ह्यात आरोपींना सहकार्य करणाऱ्या कुमार हॉलचा मालक मोहम्मद बिलाल गुलाम मुस्तफा खान याला दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. तसेच, आणखी एक आरोपी तौसिफ महम्मद साब शेख (रा. दांडाळ, सध्या आझम नगर बेळगाव) याला पोलीस निरीक्षक (PI) बी. आर. गड्डेकर, माळमारुती पोलीस स्टेशन यांनी दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी अटक करून न्यायालयासमोर हजर केले आणि त्याचीही न्यायालयीन कोठडी मिळवण्यात आली.

तपासादरम्यान, आरोपींकडून जप्त केलेले मोबाईल आणि लॅपटॉप न्यायालयाच्या परवानगीने तांत्रिक तपासणीसाठी पाठवण्यात आले. या तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींनी सहाहून अधिक अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधल्याची माहिती तसेच सायबर आर्थिक फसवणुकीशी संबंधित पुरावे आढळून आले आहेत.

“या प्रकरणामध्ये आरोपींनी परदेशी नागरिकांना फसवण्याचा उद्देश ठेवला होता आणि आरोपी परराज्यातील असल्याने तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर साक्षीदारांशी संपर्क साधण्यासाठी इंटरपोलची मदत आवश्यक आहे,” असे मत बेळगाव पोलिसांनी व्यक्त केले. तपासासाठी अधिक मनुष्यबळ आणि उच्चस्तरीय तांत्रिक मदतीची निकड लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी सदर प्रकरण सीआयडी, बंगळुरू यांच्याकडे वर्ग करण्याची विनंती केली होती. या विनंतीवरून, मा. डीजी-आयजीपी, बंगळूरू यांनी पुढील तपासासाठी हे प्रकरण सीआयडी, बंगळुरू यांच्याकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.