बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगर पालिकेने शहरातील नागरिकांची डोकेदुखी ठरलेली एक मोठी समस्या मुळापासून दूर केली आहे. बळ्ळारी नाल्याला लागून असलेल्या बी.एस. येडियुरप्पा मार्गावरील प्रभाग क्रमांक २१ हा कचऱ्याचा कुख्यात ‘ब्लॅक स्पॉट’ आता इतिहासजमा करण्यात आला आहे.
आरोग्य निरीक्षिका शिल्पा कुंभार यांच्या नेतृत्वाखालील महापालिका कर्मचाऱ्यांच्या चमूने या परिसराची केवळ स्वच्छताच केली नाही, तर सुंदर कल्पनांचा वापर करून या जागेचे सुशोभीकरणही केले आहे. दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेला हा परिसर आता नागरिकांसाठी दिलासादायक ठरला आहे.
हा ‘ब्लॅक स्पॉट’ गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक नागरिकांसाठी त्रासदायक ठरत होता. महापालिका कर्मचाऱ्यांनी वारंवार स्वच्छता करूनही, गोदामातील टाकाऊ वस्तू, प्लॅस्टिक, रासायनिक द्रव्ये, वैद्यकीय कचरा आणि जुनी वस्त्रे यांसारखा निरुपयोगी कचरा येथे फेकला जात होता.
इतकेच नाही, तर काही लोक या कचऱ्याला आग लावून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण निर्माण करत होते. यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले होते.
महापालिकेने ही जागा कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी आता अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. यापुढे या सुशोभित केलेल्या जागेवर कोणीही कचरा टाकताना आढळल्यास, त्यांच्याकडून थेट ५ हजार रुपये दंडाची वसुली केली जाईल, असा कडक इशारा देण्यात आला आहे.



