बेळगाव लाईव्ह : राणी चन्नम्मा लघु प्राणिसंग्रहालयामध्ये एकूण ३१ काळविटांचा गूढ पद्धतीने मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी वन विभागाच्या डीएफओ आणि आरएफओ यांना दिले आहेत.
मंत्री जारकीहोळी यांनी कुवेंपुनगर येथे प्राणीसंग्रहालय विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष रंगस्वामी यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राणी चन्नम्मा लघु प्राणिसंग्रहालयात एकूण ३१ काळवीट दगावले आहेत.
या मृत्यूचे कारण काय आहे, अशी माहिती त्यांनी वन अधिकाऱ्यांकडून मागितली. राणी चन्नम्मा लघु प्राणिसंग्रहालयात ३१ काळविटांचा मृत्यू होणे, ही अत्यंत दुःखाची बाब आहे, असे मंत्री जारकीहोळी म्हणाले. त्यांनी काळविटांच्या रक्षणार्थ आणि या गूढ मृत्यूंच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तातडीने समग्र तपासणी करण्याचे निर्देश वन अधिकाऱ्यांना दिले.
प्राथमिक अहवालानुसार, हा मृत्यू संसर्गामुळे झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाबाबत आलेल्या आरोपांची अत्यंत गंभीर दखल घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ३१ काळविटांच्या मृत्यू प्रकरणी, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच, उर्वरित काळविटांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना लागू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्राणीसंग्रहालय विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष रंगस्वामी, डीएफओ, आरएफओ आणि इतर अधिकारी उपस्थित होते.


