बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या निवडणुकीत जारकिहोळी गटाने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. बैलहोंगल, कित्तूर, निप्पाणी आणि हुक्केरी या सहकारी क्षेत्रांतून अनुक्रमे महांतेश दोडडगौडर, नानासाहेब पाटील, अण्णासाहेब जोल्ले आणि रमेश कत्ती यांनी विजय मिळवला असल्याची माहिती निवडणूक अधिकारी श्रवणकुमार नाईक यांनी दिली.
रविवारी बेळगाव डीसीसी बँकेच्या आवारात झालेल्या पत्रकार परिषदेत नाईक म्हणाले, “न्यायालयाच्या आदेशामुळे निकाल जाहीर करण्यात काहीसा विलंब झाला. बैलहोंगल क्षेत्रातून महांतेश दोडडगौडर यांनी ५४ मते मिळवत व्ही. आय. पाटील (२१ मते) यांचा पराभव केला. कित्तूर क्षेत्रातून नानासाहेब पाटील यांनी १७ मते मिळवत विक्रम इनामदार (१५ मते) यांच्यावर मात केली. निप्पाणी क्षेत्रातून अण्णासाहेब जोल्ले यांनी ७१ मते मिळवून उत्तम पाटील (४८ मते) यांचा पराभव केला, तर हुक्केरी क्षेत्रातून रमेश कत्ती यांनी ५९ मते मिळवत राजेंद्र पाटील (३२ मते) यांच्यावर विजय मिळवला,” अशी माहिती त्यांनी दिली.
निप्पाणी सहकारी क्षेत्राचे नव्याने निवडून आलेले संचालक अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, “मी डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाचा इच्छुक आहे. या पदासाठी सर्वजण इच्छुक आहेत. आमदार भालचंद्र जारकिहोळी आणि मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या चर्चेनंतर अध्यक्षाची निवड केली जाईल. कोणत्याही गटबाजीचा प्रश्न नाही; काही जण अफवा पसरवत आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कित्तूर क्षेत्रातील नव्याने निवडून आलेले संचालक नानासाहेब पाटील म्हणाले, “आमच्या विरोधकांनी फक्त एक मत अमान्य झाल्याचे सांगितले, पण तसे नाही. आमच्याही हातात राजकारण आहे आणि आम्ही राजकीय रणनीतीतूनच विजय मिळवला आहे. मी मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या गटातील आहे आणि माझ्या विजयासाठी विधायक बाबासाहेब पाटील व कित्तूर सहकारी क्षेत्रातील मतदारांचे आभार मानतो,” असे त्यांनी सांगितले.
बैलहोंगल क्षेत्रातील विजयी उमेदवार महांतेश दोडडगौडर म्हणाले, “मी अधिकृतपणे विजय मिळवला आहे. कित्तूर क्षेत्राची जबाबदारीदेखील माझ्यावर होती. आमच्या पॅनेलमधील विक्रम इनामदार यांना पराभव झाला असला तरी कोणावरही दोषारोप करणे योग्य नाही,” असे त्यांनी नमूद केले.


