बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य रायता संघ आणि हसरू सेनेने 11 डिसेंबर रोजी बेळगावात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. विधानसौधात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन होत असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
शेतकरी संघटनेने जारी केलेल्या पत्रकात शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले असून, मागण्या तातडीने स्वीकारण्याची मागणी केली आहे. जिलाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे याना निवेदन देत शेतकऱ्यांनी या आंदोलनाची घोषणा केली आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या:
- शेतकऱ्यांसाठी कायदेशीर हमीभावासह योग्य किमान आधारभूत किंमत (MSP) लागू करावी.
- उस कारखान्यांकडून थकीत देणे तातडीने वसूल करून शेतकऱ्यांना अदा करावीत.
- जमीन अधिग्रहणात योग्य भरपाई देण्यासाठी स्पष्ट धोरण राबवावे.
- शेती कर्जमाफी, खत–बियाण्यांच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण, आणि सिंचन प्रकल्पांसाठी निधी वाढवावा.
- शेतकरी आणि किसान कामगारांसाठी महिन्याला 1000 रुपये पेन्शन सुरू करावी.
- दुधाला प्रोत्साहनपर अनुदान वाढवून दुग्धव्यवसायाचे संरक्षण करावे.
- महिला शेतकरी, श्रमिक, आणि ग्रामीण कामगारांसाठी स्वतंत्र कल्याण योजना राबवाव्यात.
- शेतकऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत.
सरकारवर आश्वासनभंगाचा आरोप
पत्रकात शेतकरी संघटनेने आरोप केला आहे की, सरकारने वारंवार आश्वासने दिली जात असली तरी त्यातील बहुतांश मुद्दे अद्याप अंमलात आलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्या सोडवण्याबाबत प्रशासनाने गंभीरपणे पावले उचलत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचा इशारा : मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र*: संघटनेने स्पष्ट केले आहे की, 11 डिसेंबरला शांततामय पद्धतीने आंदोलन होणार असले तरी, मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरात व्यापक आंदोलन छेडले जाईल.
बेळगावमध्ये मोठी गर्दी अपेक्षित*: विधानसौधातील अधिवेशनाच्या कालावधीत होणाऱ्या या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी बेळगावात दाखल होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासन व पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यास सुरुवात केली आहे.




