बेळगाव लाईव्ह :उद्यमबाग औद्योगिक वसाहती मधील बेळगाव -खानापूर रोडला जोडणारा जीआयटी कॉलेज मागील प्रमुख रस्ता अत्यंत खराब झाला असून त्याचे युद्ध पातळीवर दुरुस्ती करण्याबरोबरच डांबरीकरण अथवा कॉंक्रिटीकरण करावे, अशी जोरदार मागणी उद्योजकांकडून केली जात आहे.
बेळगाव -खानापूर रोडला जोडणाऱ्या जीआयटी कॉलेज मागील उद्यमबाग औद्योगिक वसाहतीमध्ये जाणाऱ्या प्रमुख रस्त्याची गेल्या अनेक कांही वर्षांपासून दुर्दशा झाली आहे. वेळोवेळी तक्रार करून देखील त्याची दखल घेण्यात न आल्यामुळे, थोडक्यात महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे या मार्गावरील उद्योजकांची गैरसोय होऊन मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतो. खड्डे पडलेल्या आणि चिखलाने माखलेल्या रस्त्यावरून जीव मुठीत धरून दुचाकी वाहने हाकण्याची वेळ कामगारांवर येत असते.
पावसाळा संपल्यानंतर आता या रस्त्याच्या बाबतीत धूळ-मातीची समस्या निर्माण झाली आहे. उद्यमबागमध्ये ये -जा करणाऱ्या मालवाहतूक वाहनांची या रस्त्यावर सतत वर्दळ असते. त्यांच्या रहदारीमुळे सध्या मोठ्या प्रमाणात धुळीचे वातावरण निर्माण होत असून वर्कशॉप, कारखाने, कार्यालये, दुकाने, आसपासची घरे या सर्वांमध्ये धुळीचे लोट शिरत असल्यामुळे स्थानिक रहिवाशी आणि कामगारांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत तयार होणाऱ्या अनेक उत्पादनांना भारतासह परदेशातही मोठी मागणी असते. निर्यात होणाऱ्या उत्पादनासंदर्भात जर्मनी, जपान, इंग्लंड, कोरिया वगैरे परदेशातील उद्योजक आणि वरिष्ठ अधिकारी उद्यमबाग औद्योगिक वसाहतीला भेट देत असतात. या पाहुण्यांसमोर संबंधित वाताहत झालेल्या रस्त्यामुळे बेळगाव शहरासह संपूर्ण देशाच्या प्रतिमेला तडा जाऊ लागला आहे. तेंव्हा महापौर आणि स्थानिक लोकप्रतिनिधीसह बेळगाव महापालिका व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी.
सदर रस्ता युद्धपातळीवर एक तर त्वरित दुरुस्त करावा अथवा त्याचे डांबरीकरण किंवा कॉंक्रिटीकरण करून नूतनीकरण केले जावे, अशी जोरदार मागणी उद्यमबाग येथील उद्योजक आणि कामगारवर्गाकडून केली जात आहे.





