*बेळगाव लाईव्ह विशेष :*
बेळगाव शहरात एकेकाळी मराठा समाजाचे मोठे प्राबल्य होते. येथील मराठी भाषिक चेहरा इतका स्पष्ट होता की मराठी भाषिक आणि मराठा समाज हे समीकरण जवळपास समपातळीवर चालत असे. मराठा समाजाची बेळगावमध्ये आर्थिक आणि सामाजिक ताकद मोठी होती. या समाजाने केवळ शेतजमिनीच नव्हे, तर बेळगाव शहर परिसरातील गल्लोगल्लीतील टोलेजंग वाडे आणि इमारतींची मालकीही जपली होती.
मात्र, विकासाच्या नावाखाली आणि काळाच्या ओघात या वडिलोपार्जित मालमत्तांचा आधार हळूहळू कमकुवत झाला. अनेक वाड्यांची आणि मालमत्तांची प्रचंड मोठ्या रकमेला परप्रांतीय व्यापाऱ्यांशी विक्री झाली, ज्यामुळे मूळ मराठी माणूस, विशेषतः मराठा समाज, शहराच्या मध्यभागातून उपनगरांमध्ये किंवा बेळगावच्या बाहेर विस्थापित होत गेला — आणि आजही होत आहे.
या विस्थापनाचे एक अत्यंत वेदनादायक आणि बोलके उदाहरण म्हणजे बेळगाव शहरातील *पांगुळ गल्ली*. एकेकाळी या गल्लीतील ९० टक्क्यांहून अधिक घरे मराठा समाजाची होती, परंतु आज इथे अपवाद वगळता एकही घर मराठा समाजाच्या ताब्यात दिसत नाही. या भागात परप्रांतीय व्यापाऱ्यांचा इतका मोठा भरणा झाला आहे की ही गल्ली कधीकाळी मराठा समाजाची होती ही जुनी ओळख देखील धूसर झाली असून, आता ती केवळ परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या नावाने ओळखली जाऊ लागली आहे.
जुनी घरे पाडून त्या ठिकाणी मोठ्या कॉम्प्लेक्स उभ्या राहणे, नवीन इमारती बांधल्या जाणे आणि बाहेरच्या व्यापाऱ्यांचे आगमन होणे हे महसुलाच्या दृष्टीने प्रगतीचे लक्षण मानले जाऊ शकते. परंतु या बदलांमुळे बेळगावमधील बहुतांशी व्यवसायांवरील मराठा समाजाची पकड उरलेली नाही. प्रत्येक महत्त्वाच्या व्यवसायात आता परप्रांतीय व्यापाऱ्यांनी आपला जम बसवला असून, मराठा समाजाचा प्रभाव काळानुसार हळूहळू कमी होत गेला आहे.
या आर्थिक पकड कमकुवत होण्यामागे मराठा समाजातील काही कुटुंबांना लागलेली वाईट सवय हे एक मुख्य कारण आहे. वडिलोपार्जित मालमत्ता प्रचंड मोठ्या रकमेला विकून, त्यातून आलेल्या पैशातून केवळ चैनी आणि उपभोग घेण्याकडे अनेक कुटुंबांचा कल वाढला. बहुतांशी नवी पिढी याच पैशांच्या जोरावर आपले भविष्य तोलत असल्याचे चित्र आहे; मात्र हे तंत्र समाजासाठी घातक ठरले आहे.
आलेल्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक न करणे, भविष्यकालीन तजवीज न करता केवळ वर्तमान काळाचा विचार करून जगणे, उपनगरात मोठी घरे घेणे आणि महागड्या गाड्या घेणे यावर भर दिला गेला. त्यामुळे, ज्या ठिकाणी मराठा समाज बहुसंख्येत होता आणि त्यांच्या हाताखाली परप्रांतीय नोकरदार म्हणून काम करत होते, आज त्याच ठिकाणी परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या हाताखाली मराठा समाजातील तरुणांना नोकरदार म्हणून काम करण्याची वेळ आली आहे — हे विदारक सत्य आहे.
या विदारक परिस्थितीमुळे अनेक तरुण व्यसनाधीनतेकडेही वळालेले दिसतात. अमाप पैसा असल्याने मेहनत आणि कष्टापासून मराठा समाजातील तरुण वर्ग दूर झाला आहे. अंगावर पुरेशी जबाबदारी न पडल्याने किंवा वडिलोपार्जित मालमत्ता विकून आलेल्या पैशांवर उपजीविका चालत असल्याने, तरुण मोठ्या संख्येने व्यसनाधीन झाले आहेत.
*‘ठेविले अनंते तैसेची रहावे’* या उक्तीप्रमाणे मराठा समाज केवळ आहे त्या गोष्टीत समाधान मानत राहिला. भविष्याची तजवीज झाली, पण भविष्य अधिक सुदृढ आणि भरभराटीचे करण्यासाठी आवश्यक व्यावसायिक दृष्टिकोन आणि दूरदृष्टीचा मात्र अभाव राहिला. परिणामी, तो पैसा संपल्यानंतर त्यांची परिस्थिती बिकट झाली आणि आज ज्या ठिकाणी त्यांच्या इमारती होत्या, तिथेच त्यांना त्या व्यापाऱ्यांकडे कामाला राहण्याची वेळ आली आहे.
हे गंभीर वास्तव बदलण्यासाठी आणि बेळगावमधील व्यवसायांवर मराठा समाजाची पकड पुन्हा मजबूत करण्यासाठी आता *‘पांगुळ गल्लीत पुन्हा व्यावसायिक मशाली पेटवणे’* आवश्यक आहे. बेकरी व्यवसाय, एपीएमसी संबंधित व्यापार यांसारखे हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद वगळता अन्य कोणत्याही प्रमुख व्यावसायिक क्षेत्रात मराठा समाजातील तरुण व्यावसायिक म्हणून दिसून येत नाहीत. अनेक ठिकाणी ते केवळ कामगार म्हणूनच कार्यरत असल्याचे विदारक चित्र आहे.
हे चित्र बदलण्यासाठी मराठा समाजातील युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण, योग्य सल्ला आणि मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेले व्यवसाय, जे परप्रांतीय व्यापाऱ्यांनी काबीज केले आहेत, ते आता मराठा समाजाने पुन्हा आपल्याकडे वळवणे गरजेचे आहे. यासाठी व्यावसायिक कर्ज, सरकारी योजना आणि व्यावसायिक कार्यशाळा यांची माहिती घेऊन त्या दिशेने तातडीने वाटचाल करणे हे मराठा समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.



