बेळगाव लाईव्ह : जोपर्यंत तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिज रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टिळकवाडी येथील देशमुख रोड या रस्त्यावर एल अँड टी कंपनीने हाती घेतलेले खुदाई आणि दुरुस्तीचे काम बंद ठेवावे, अशी मागणी समस्त वाहन चालकांच्यावतीने माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी केली आहे.
टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेटवर ब्रिजच्या डांबरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे बेळगाव -खानापूर रोडवरील वाहतूक संपूर्णपणे काँग्रेस रोड मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी वाहतुकीचा ताण वाढलेला आहे. परिणामी अनगोळ, हिंदवाडी वगैरे रेल्वे मार्गापलीकडील भागात जाणाऱ्या वाहनांची गेल्या कांही दिवसांपासून दुसरे रेल्वे गेट येथील हेरवाडकर हायस्कूल समोरील रस्ता आणि पहिल्या गेट येथील देशमुख रोड रस्त्यावर मोठी गर्दी होत आहे.
यात भर म्हणून मंगळवार पेठ आणि बुधवार पेठ दरम्यानच्या कित्तूर बंगल्या शेजारी देशमुख रोडवर एल अँड टी कंपनीने जलवाहिनी संदर्भात दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. खुदाईच्या कारणास्तव 8-10 फुटाचा रस्ता फीत लावून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आधीच पुरेसा मोठा नसणारा हा रस्ता अधिक अरुंद झाला असून या ठिकाणी सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
बेळगाव -खानापूर रोडवरील संपूर्ण वाहतूक काँग्रेस रोडवर वळविण्यात आल्यामुळे सदर मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढणार आहे. त्यामुळे देशमुख रोडवर सध्या आपण खुदाई करणे उचित नाही इतके सर्वसामान्य ज्ञान देखील एल अँड टी कंपनीच्या स्थानिक वरिष्ठाना नाही का? असा संतप्त सवाल वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात बेळगाव लाईव्हसमोर अनगोळ येथील जागरूक माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

एल अँड टी च्या रस्ता खुदाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती देऊन जोपर्यंत अनगोळ चौथे रेल्वे गेट येथील अंडरपास रस्ता आणि तिसरे रेल्वे गेट ओव्हर ब्रिज वरील रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत एल अँड टी कंपनीने आपले काम थांबवावे. त्याचप्रमाणे देशमुख रोडवरील खोदकाम करण्यात आलेला रस्ता तूर्तास बुजवून रहदारीस अनुकूल बनवावा, अशी जोरदार मागणी त्यांनी समस्त वाहनचालकांच्यावतीने केली.





