बेळगाव लाईव्ह : उत्तर प्रदेश नागरी सेवेत (उत्तर प्रदेश पब्लिक सर्विस कमिशन) रुजू होण्याचे निमंत्रण मिळाल्यामुळे बेळगाव कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल सारस्वत हे लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळाली आहे.
विशाल सारस्वत हे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) तर्फे निवड झालेले अधिकारी असून त्यांनी UPSC परीक्षेत देशात 591 वी रँक मिळवली होती. विशेष म्हणजे त्यांनी कोणतेही कोचिंग न घेता स्व-अभ्यासातून हे यश मिळवले होते.
त्यानंतर त्यांची उत्तर प्रदेश नागरी सेवेमध्ये नियुक्ती झाली होती, उत्तर प्रदेश सिविल सर्विस परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले होते मात्र संबंधित प्रक्रियेमध्ये काही कायदेशीर अडथळे निर्माण झाल्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत उत्तीर्ण झालेल्या परीक्षेनुसार अंतरिमरीत्या त्यांची नियुक्ती भारतीय संरक्षण इस्टेट सेवा (IDES) अंतर्गत बेळगाव कॅन्टोनमेंट बोर्ड सीईओ म्हणून करण्यात आली होती.
आता त्यांच्या सेवेसंबंधीचा न्यायालयीन अडथळा दूर झाल्याने उत्तर प्रदेश सरकारने त्यांना पुन्हा रुजू होण्यासाठी बोलावले आहे. त्यामुळे विशाल सारस्वत यांनी बेळगाव सीईओ पदाचा तांत्रिक राजीनामा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
सारस्वत यांच्या संभाव्य निर्गमामुळे कॅन्टोनमेंट बोर्डात नवे सीईओ कोण येणार? याबाबत कर्मचारी आणि शहरवासीयांमध्ये उत्सुकता आहे.


