बेळगाव लाईव्ह : मार्केट पोलिसांसह शहापूर व एपीएमसी पोलिसांनी काल मंगळवारी विविध 6 गुन्हेगारी प्रकरणांमध्ये 10 जणांना अटक केली असून त्यांच्याकडील रोख 11,400 रुपये, एक ड्रॅगन चाकू आणि ओसी मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी काल मंगळवारी उघडकीस आणलेल्या गुन्हेगारी प्रकरणापैकी पहिल्या प्रकरणात गल्ली येथील मोडका बाजारा शेजारी सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शशीकुमार कुरळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकून मटका खेळणाऱ्या तिघा जणांना अटक केली.
तसेच त्यांच्या जवळील रोख 4,450 रुपये आणि मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे जहीरअब्बास मोहम्मद रफीक शेख (वय 47, जालगार गल्ली बेळगाव), प्रशांत व्यंकटेश रेवणकर (वय 61, रा. विष्णू गल्ली, वडगाव बेळगाव) आणि फहीम जिलानी कोतवाल (रा. खंजर गल्ली बेळगाव) अशी आहेत. दुसऱ्या घटनेत शहरातील जुन्या भाजी मार्केट शेजारी सार्वजनिक ठिकाणी मटका खेळणाऱ्या तिघा जणांना मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हवन्नावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अटक केली.
तसेच त्यांच्याकडील रोख 3200 रुपये आणि मटक्याचा चिठ्ठ्या जप्त केल्या. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे सुनील दोंडबा (वय 51, रा. कामत गल्ली बेळगाव), शमशेर अल्लाबक्ष पिरजादे (वय 35, रा. चौथा क्रॉस अमननगर बेळगाव) आणि गजानन शशिकांत गरडे (रा. कामत गल्ली) बेळगाव अशी आहेत. तिसऱ्या प्रकरणात चाकू सारखे प्राणघातक शस्त्र घेऊन रस्त्यावर वावरणाऱ्या एका इसमाला मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हवन्नावर यांच्या नेतृत्वाखालील अँटी स्टॅबिंग पथकाने ताब्यात घेतले.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव विनायक उर्फ विर्लक शंकर प्रधान (वय 50, रा. महाद्वार रोड, तिसरा क्रॉस बेळगाव) असे आहे. शहरातील समर्थनगरकडे जाणाऱ्या नाल्या शेजारी सार्वजनिक रस्त्यावर काल गस्तीवर असणाऱ्या मार्केट पोलिसांच्या अँटी स्टॅबिंग पथकाने संशयावरून विनायक याची झडती घेतली असता त्याच्याकडे हिरव्या मुठीचा प्राणघातक ड्रॅगन चाकू सापडला. उपरोक्त तीनही प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे नोंद झाले असून अधिक तपास सुरू आहे.
चौथ्या प्रकरणात बेळगाव एपीएमसी मार्केट यार्ड गेट शेजारी सार्वजनिक ठिकाणी ओसी मटका अड्डा चालवणाऱ्या एका मटका बुकीला एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. आर. मुत्तती यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली. तसेच त्याच्या जवळील रोख 700 रुपये आणि मटक्याचा चिठ्ठ्या जप्त केल्या. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव विनायक विजेशकुमार मादर (वय 36, रा. रामनगर, चौथा क्रॉस कंग्राळी खुर्द बेळगाव) असे आहे. पाचव्या प्रकरणात पोस्टल ग्रील हॉटेल, बॉक्साइट रोड शेजारी सार्वजनिक ठिकाणी ओसी मटक्याचा अड्डा चालवणाऱ्या मोहन यल्लाप्पा किल्लेकर (वय 36, रा. रामनगर, चौथा क्रॉस कंग्राळी खुर्द बेळगाव) याला एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. जी. होनवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने काल अटक केली. तसेच त्याच्या जवळील रोख 800 रुपये आणि मटक्याचा चिठ्ठ्या जप्त केल्या.
या दोन्ही प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सहाव्या प्रकरणात वडगाव, कलमेश्वर रोड श्री गणपती देवस्थाना शेजारी सार्वजनिक ठिकाणी मटक्याचा अड्डा चालविणाऱ्या एका इसमास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एन. बसपा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून ताब्यात घेतले. तसेच त्याच्या जवळील 2250 रुपये आणि मटक्याचा चिठ्ठ्या जप्त केल्या. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव किशन मल्लाप्पा पाटील (वय 50, रा. ताशिलदार गल्ली बेळगाव) असे आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.


