बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून हेस्कॉमच्या मनमानीमुळे विजेचा खेळखंडोबा सुरू असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मंगळवारी देखील भांदुर गल्ली रविवार पेठ आणि शहरातील विविध परिसरात कोणतीही पूर्वकल्पना न देता वीज पुरवठा खंडित केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
याबाबत हेस्कॉमला विचारणा केली असता दुरुस्तीसाठी सायंकाळी चार वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित होणार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे.
कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने घरगुती ग्राहक, व्यावसायिक आणि उद्योगधंदे करणाऱ्यांचे हाल होत आहेत.परिसरातील वीज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तासन्तास गायब होत असल्याने नियोजित कामांमध्ये अडथळा निर्माण होत असून व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे.
याबाबत विचारणा केली असता “दुरुस्ती सुरू आहे” असे एकच उत्तर देण्यात येत असून खंडित वीजपुरवठ्यामागील खरे कारण स्पष्ट केले जात नाही, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
महानगरातील विविध भागांत सतत आणि अनियमित वीजबंदी होत असल्याने हेस्कॉमचा कारभार चव्हाट्यावर येऊ लागला आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की,
“जर वीज कपात दुरुस्ती किंवा तांत्रिक कारणास्तव केली जात असेल, तर किमान पूर्वसूचना द्यावी. अचानक वीज खंडित करणे हा जनतेशी केलेला अन्याय आहे.”
नागरिकांनी हेस्कॉमकडे मागणी केली आहे की,
• वीज बंद करण्याची कारणे स्पष्ट करावीत
• वीजबंदीपूर्वी SMS / सोशल मीडिया / नोटीसद्वारे माहिती द्यावी
• आणि कारभारात सुधारणा करावी
अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास भाग पडतील, असा इशाराही देण्यात आला आहे.




