बेळगाव लाईव्ह: अगरबत्ती पॅकिंगच्या गृहोद्योगाच्या नावाखाली बेळगाव परिसरातील शेकडो महिलांना लाखो रुपयांना फसवणाऱ्या मुख्य आरोपीला बेळगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यामुळे आरोपी कारागृहात न जाता त्याची सुटका झाली आहे.
बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर (वय ३५, रा. पंढरपूर) असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने ‘बी. एम. ग्रुप महिला गृहोद्योग समूह’ या नावाने महिलांना अगरबत्ती पॅकिंगचे काम देण्याचे आमिष दाखवले होते.
प्रत्येक महिलेकडून ओळखपत्रासाठी अडीच हजार रुपये घेऊन त्याने मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली. काम पूर्ण झाल्यावर तीन हजार रुपये पगार देण्याचे आश्वासन देऊनही त्याने महिलांना पगार दिला नाही किंवा त्यांचे गुंतवलेले पैसे परत केले नाहीत. याप्रकरणी खासबाग, शहापूर येथील लक्ष्मी आनंद कांबळे यांनी २५ ऑक्टोबर रोजी शहापूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती.

शहापूर पोलिसांनी ४ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपी बाबासाहेब कोळेकर याला अटक केली होती. त्याच्यावर कलम ३१६ आणि ३१८ नुसार गुन्हा दाखल होता. आरोपीने तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज केला असता, त्यावर सुनावणी होऊन तात्पुरता जामीन मंजूर झाला. त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी मुख्य जामीन अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने त्याला मुख्य जामीन मंजूर केला.
त्यामुळे अटकेनंतर तो कारागृहात न जाता थेट जामिनावर बाहेर आला. आरोपीच्या वतीने वकील प्रताप यादव, हेमराज बेंचन्नावर आणि स्वप्नील नाईक यांनी बाजू मांडली. तृतीय प्रथमवर्गीय न्यायालयाने हा जामीन अर्ज मंजूर केला.


