बेळगाव लाईव्ह : घरातील अध्यात्मिक वातावरण, सततच्या हरिनाम-कीर्तनाचा संस्कार आणि वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा — या भक्तीमय संस्कारांची प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे कडोली येथील श्रेयन श्रीधर बाबली. नुकत्याच पार पडलेल्या प्रतिभा कारंजी स्पर्धेत प्राथमिक विभागातील भक्तीगीत स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक पटकावून श्रेयने आपली भजनी-भक्ती प्रतिभा उजवली.
जाफरवाडी (ता. जि. बेळगाव) येथील प्राथमिक शाळेमध्ये गुरुवारी झालेल्या स्पर्धेमध्ये श्रेयनने सादर केलेले भक्तीगीत प्रेक्षक व परीक्षकांच्या मनाला भावले.
दुसरीत शिकणारा हा विद्यार्थी श्री स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, कडोली येथे शिक्षण घेत आहे.
वारकरी घराण्याची देणगी: कडोली येथील शेतकरी श्रीधर बाबली यांचा चिरंजीव असलेला श्रेयन हा बेळगाव शहापूर वारकरी सेवाभावी संघटनेचे प्रमुख हभप शंकरमहाराज बाबली यांचा नातू आहे.
घरात सतत चालणारे भजन-कीर्तन, हरिनाम सप्ताह आणि वारकरी संप्रदायाचे व्रत — यामुळे श्रेयनला लहानपणापासून भक्तीगीतात रस निर्माण झाला. त्याने कोणतेही औपचारिक संगीत प्रशिक्षण न घेताही स्वतः अभ्यास करून भक्तीगीतामध्ये प्रावीण्य मिळवले आहे.
गावात आणि शाळेत कौतुक: प्रतिभा कारंजीतील विजयाबद्दल श्रेयनचे शाळेमध्ये, गावी तसेच वारकरी मंडळाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
त्याच्या पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या स्पर्धेत अदिती सुतार यांनी भक्ती गीत, अर्जिण धामणेकर धार्मिक पठण, वेदिका शहापूरकर कन्नड पाठांतर,अन्वी पाटील हिंदी पाठांतर,ख़ुशी मराठी पाठांतर,फैझल नदाफ हिंदी पाठांतरअशी यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.




