बेळगाव लाईव्ह : हत्तरगी टोलनाका येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची आज शनिवारी सकाळी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) हितेंद्र यांनी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन विचारपूस केली.
उसाला प्रति टन 3500 रुपये दर द्यावा, या मागणीसाठी काळ शुक्रवारी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर हत्तरगी टोल नाक्याजवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रास्तारोको केला. या आंदोलनाला हिंसक वळण लागून शेतकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत 11 पोलीस जखमी झाले. जखमी झालेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांची आज शनिवारी सकाळी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) हितेंद्र यांनी भेट घेऊन विचारपूस केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना एडीजीपी हितेंद्र म्हणाले की, हत्तरगी टोलनाका येथे काल घडलेल्या घटनेत आमचे 11 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. कोणतीही अनिष्ट घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू असताना दुर्दैवाने काळजी घटना घडली. याबाबतची माहिती मिळताच मी स्वतः रात्री तातडीने बेळगावात आलो.
मी आमच्या जखमी कर्मचार्यांची प्रकृती विचारपूस असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. हत्तरगी टोलनाका येथील कालच्या घटनेबाबत यमकनमर्डी पोलिस ठाण्यात आधीच गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्या अनुषंगाने घटनास्थळी असलेले 40-50 सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. काल शेतकरी आंदोलनादरम्यान मोठी गर्दी जमल्याने परिस्थिति बिघडली असे सांगून पोलिसांना लाठीमार करण्याचे कोणतेही आदेश आम्ही दिले नव्हते, असे एडीजीपी हितेंद्र यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, शेतकरी आंदोलकांना नियंत्रणात ठेवण्याचा पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केला. त्यासाठी शेतकऱ्यांकडून ही सहकार्य मिळत होते, त्यामुळे कांही असामाजिक तत्वांनी परिस्थिती बिघडवली असण्याची शक्यता आम्ही तपासत आहोत. कालच्या घटनेसंदर्भात सर्वांगाने सखोल तपासणी केली जाणार असून मी स्वतः घटनास्थळाला भेट देणार आहे. या घटनेत 4-5 शासकीय वाहनांसह एकूण 10 पेक्षा जास्त वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. व्हिडीओ तपासल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे एडीजीपी हितेंद्र यांनी सांगितले.


