बेळगाव लाईव्ह :नेरली (ता. हुक्केरी) येथील सेंट्रींग कामगार मल्लिकार्जुन रामप्पा सालीमनी (38) व त्यांची पत्नी सरोजनी मल्लिकार्जुन सालीमनी (32) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी पहाटे घडली. या दोघांच्या मृत्यूची नोंद संकेश्वर पोलिसांत करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेरली सिध्दार्थ नगर येथील विहिरीत पत्नी सरोजनी यांनी पहाटे चार वाजता उडी घेतली. हे पाहताच घाबरलेल्या पती मल्लिकार्जुन यांनी पत्नीला वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली. मात्र सरोजनी बुडून मरण पावली, तर पोहता न येत असल्याने मल्लिकार्जुनही पाण्यातच बुडून मृत्यू पावले, अशी फिर्याद मल्लिकार्जुन यांचे वडील रामप्पा सालीमनी यांनी संकेश्वर पोलिसांत दिली.
प्रारंभी पोलिसांनी हा प्रकार विवाहित महिलेवर सासरी होत असलेल्या कथित छळामुळे आत्महत्या असा दाखल केला होता. सरोजनीच्या मृत्यूसाठी पती मल्लिकार्जुन, सावत्र सासू रमचय्या मारुती कांबळे आणि सासरा मारुती कांबळे जबाबदार असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.
दरम्यान, आरोपींचा शोध सुरू असतानाच मल्लिकार्जुनही विहिरीत मृत अवस्थेत आढळल्याने पोलिसांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. वडील रामप्पा नागप्पा सालीमनी यांच्या तक्रारीवरून संकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संकेश्वर पोलीस ठाण्याचे पीएसआय एस. डी. जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.



