बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील कमळदिन्नी गावात एक अत्यंत क्रूर आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह पलंगाखाली लपवून पतीने मोबाईल बंद करून पलायन केल्याचे समोर आले आहे. हुंड्यासाठी छळ करून पतीनेच हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त होत असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
साक्षी आकाश कुंभार (वय २०) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी साक्षीचा आकाश याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर आकाश हा हुंडा आणण्यासाठी साक्षीचा सतत छळ करत होता, अशी प्राथमिक माहिती आणि संशय व्यक्त होत आहे.
तीन दिवसांपूर्वी पतीने पत्नीचा खून करून पलायन केले. दरम्यान, मुंबईला गेलेली त्याची आई जेव्हा परत घरी आली, तेव्हा हा गंभीर प्रकार उघडकीस आला.
या घटनेची माहिती मिळताच मुडलगी पोलीस आणि गोकाकचे डीवायएसपी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि कसून तपासणी सुरू केली आहे. तसेच, मुडलगीचे तहसीलदार श्रीशैल गुुडमे यांनीही घटनास्थळी भेट दिली. ही घटना मुडलगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.


