बेळगाव लाईव्ह : शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या लक्ष्मी टेक पंप हाऊसचे गेट बंद करून व्हॉल्व्हमन कर्मचाऱ्यांनी आज वेतन कपात आणि वेळेवर पगार न मिळाल्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन केले. ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
जवळपास २७ वर्षांपासून सेवा देत असलेल्या या व्हॉल्व्हमन कर्मचाऱ्यांचे दर महिन्याच्या वेतनात कपात केली जात आहे. इतकेच नव्हे तर, त्यांना मासिक वेतनही वेळेवर मिळत नाही.
महापौर आणि जिल्हा पालकमंत्र्यांकडे विनंती करूनही काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे हताश झालेल्या कर्मचाऱ्यांनी आज हे आंदोलन केले. २७ वर्षांची दीर्घ सेवा देऊनही या कर्मचाऱ्यांना कोणतीही ‘सेवासुरक्षा’ किंवा ‘कायमस्वरूपी नियुक्ती’ देण्यात आलेली नाही. त्यामुळे ते असुरक्षिततेच्या भावनेत काम करत आहेत.
दलित नेते मल्लेश चौगुले यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत, “कर्मचारी रोज काम करतात, पण त्यांना योग्य सोयीसुविधा आणि वेतन मिळत नाही. सणाच्या काळात जनतेला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी प्रतिकात्मक आंदोलन केले आहे. महानगरपालिका आणि अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत वेतन मिळेल अशी व्यवस्था करावी,” अशी मागणी केली.
पाणी पुरवठा मंडळाकडून महानगरपालिकेकडे काम हस्तांतरित झाल्यावर हे काम ‘एल अँड टी’ एजन्सीकडे देण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हॉल्व्हमन कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची प्रक्रिया सुरू असल्याने वेतनात विलंब झाला. महानगरपालिकेच्या मुख्य अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर यांनी वेतन कपातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘अपेक्स एजन्सी’कडून पगार देण्यास विलंब झाल्याचे स्पष्ट केले. “आज सायंकाळपर्यंत या महिन्याचे वेतन दिले जाईल आणि यापुढे वेतनाला विलंब होणार नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले.
अधिकाऱ्यांच्या या ठोस आश्वासनानंतर व्हॉल्व्हमन कर्मचाऱ्यांनी आपले गेट बंद आंदोलन तात्काळ मागे घेतले.




