बेळगाव लाईव्ह : बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी दोनच दिवसापूर्वी बंगळुरू मुंबई सुपरफास्ट सुरू करण्याबाबत मागणी करत वक्तव्य केले होते त्यानंतर हुबळीचे खासदार प्रल्हाद जोशी यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र देत या स्वरूपाची मागणी केली आहे.
कर्नाटकातील बेळगाव हुबळी बेंगळूर भागातील प्रवाशांची गरज लक्षात घेता बंगळूर-मुंबई मार्गावर आणखी एक सुपरफास्ट रेल्वे सेवा सुरु करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. नवी दिल्लीत भेट घेतल्यानंतर मंत्री वैष्णव यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
नवीन सुपरफास्ट रेल्वे तुमकूर, दावणगेरी, हावेरी, हुबळी-धारवाड आणि बेळगावमार्गे धावेल. यामुळे बेळगावसह राज्याच्या मध्यवर्ती भागात राहणाऱ्या लोकांचा मुंबई आणि बंगळूर शहराशी थेट संपर्क होईल. संबंधित अधिकाऱ्यांना नवीन रेल्वे वेळापत्रक तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नवीन रेल्वे सुरु झाल्यास
कर्नाटकच्या विकासाला चालना मिळेल. मुंबई आणि बंगळूर औद्योगिक विकासाला गती देईल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
हावेरी-गदगचे खासदार बसवराज बोम्मई, बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर, बंगळुरचे खासदार तेजस्वी सूर्या इत्यादी रेल्वे सेवेच्या विस्तारासाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्य रेल्वे मंत्री व्ही. सोमण्णा यांच्या सहकायनि बंगळूर, हुबळी आणि मुंबई रेल्वे स्थानकांवर फलाटांची संख्या वाढवल्यामुळे सुपरफास्ट गाड्या धावणे शक्य झाले आहे.
ही नवीन रेल्वे सुरु झाल्यास कर्नाटकातील विविध जिल्ह्यांतील लोकांसाठी मुंबईचा प्रवास सोपा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. येत्या काळात या शहरांमधील रेल्वे प्रवास वाढेल, ज्यामुळे लाखो प्रवाशांना फायदा होईल, असे त्यांनी रेल्वेमंत्र्यांना पटवून दिले.










