बेळगाव लाईव्ह :भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी बेळगाव महापालिकेने हिरेबागेवाडी येथे तात्पुरता शेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी कुत्र्यांचे निर्बीजकरण (स्टेरिलायझेशन) करण्यात येणार असून, संबंधित कामाचा गुत्ता पुन्हा टेंडरद्वारे देण्यात आला आहे. नवीन गुत्तेदार निश्चित झाल्यानंतर केंद्राची क्षमता वाढविण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सध्या शहरातील विविध भागांतून पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना या हिरेबागेवाडी केंद्रात ठेवले जाईल. शेडचे बांधकाम पूर्ण होताच निर्बीजकरण मोहीम सुरू होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी दिली.
मारुतीनगर घटनेनंतरची कारवाई
मारुतीनगर येथे दोन वर्षांच्या बालिकेवर झालेल्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनेनंतर आयुक्त शुभा यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत एका स्थानिक रिक्षाचालकाने भटक्या कुत्र्यांना मांस खायला घातल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्या भागात मोठ्या प्रमाणात कुत्रे जमा झाले आणि गोंधळात एका कुत्र्याने मुलीवर हल्ला केला.
“त्या रिक्षाचालकाची माहिती मिळाली असून त्याच्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात येणार आहे,” असे आयुक्त शुभा यांनी सांगितले. नागरिकांनी रस्त्यांवर मांस किंवा अन्नाचा कचरा टाकू नये, अशी त्यांनी विनंती केली.

मांस विक्रेत्यांना इशारा
मोकळ्या जागेत मांसाचा कचरा टाकणाऱ्या विक्रेत्यांना महापालिकेकडून कडक नोटीस देण्यात आली आहे. “अशा प्रकारामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते आणि त्रासदायक परिस्थिती निर्माण होते. उल्लंघन सुरू राहिल्यास कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा आयुक्तांनी दिला.
शहरात चार ‘फीडिंग झोन’
भटक्या कुत्र्यांना नागरिकांकडून अन्न देण्याचे नियमन करण्यासाठी शहरात चार ठिकाणी ‘फीडिंग झोन’ तयार करण्यात येणार आहेत. “जे नागरिक कुत्र्यांना खाऊ घालू इच्छितात, त्यांनी या ठिकाणीच तसे करावे,” असे आयुक्त शुभा यांनी सांगितले.
जखमी बालिकेच्या उपचारासाठी महापालिकेने आर्थिक मदत जाहीर केली आहे. महापालिकेच्या प्राणीपालन विभागात सध्या पशुवैद्य नसल्याने लवकरच पशुवैद्य नेमण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे.
सध्या मर्यादित प्रमाणात श्रीनगर केंद्रात निर्बीजकरण शस्त्रक्रिया सुरू आहेत, मात्र मोठ्या प्रमाणातील काम हिरेबागेवाडी येथे हलविण्यात येणार आहे. भटक्या कुत्र्यांसाठी रेबीज लसीकरण मोहीमही सुरू असून ती आणखी विस्तारित केली जाणार आहे.
2022 मध्ये नियुक्त करण्यात आलेला विद्यमान गुत्तेदार सध्या काम पाहत असून, तीन अपयशी टेंडर प्रयत्नांनंतर चौथ्यांदा टेंडर जाहीर करण्यात आले आहे. यावेळी सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी महापालिकेची अपेक्षा आहे.


