बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यात धरण बांधणीसाठी जमीन संपादित केलेल्या बसुर्ते गावातील शेतकऱ्यांचा संताप आज शिगेला पोहोचला. योग्य नुकसानभरपाई देण्याच्या आश्वासनानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक अचानक रद्द केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयाला घेराव घातला. “दोन दिवसांत नुकसानभरपाई न मिळाल्यास धरण बांधकाम थांबवू,” असा थेट इशारा देत या धरणग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला खडसावले आहे.
बसुर्ते गावातील सुमारे ८० एकर जमीन धरण बांधणीसाठी संपादित करण्यात आली आहे, मात्र या शेतकऱ्यांना अद्यापही योग्य मोबदला मिळालेला नाही.
काल राणी चन्नम्मा चौकात धरणे आंदोलन केल्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी आज चर्चेसाठी बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज जिल्हाधिकारी अन्य कामात व्यस्त असल्याने बैठक अचानक रद्द करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला.
आज सकाळी मोठ्या संख्येने शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा झाले. महिला शेतकऱ्यांनी तर निराशेत अश्रू ढाळले. “कष्ट करून खोदलेल्या विहिरी आणि उभ्या पिकांवर जेसीबी फिरवून मोठे नुकसान केले आहे. आता शेतीच काढून घेतल्यावर आम्ही जगायचे कसे?” असा भावनिक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आणि स्पष्ट इशारा दिला: “जर धरण बांधले, तर आमची गावेसुद्धा उध्वस्त होतील. दोन दिवसांत योग्य नुकसानभरपाई जमा केल्यास धरण बांधायला आम्ही संमती देऊ, अन्यथा सुरू असलेले काम तात्काळ बंद पाडू!” शेतीवर अवलंबून असलेली अनेक कुटुंबे रस्त्यावर आल्यामुळे प्रशासनाने तातडीने यावर तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी शेतकरी नेत्यांनी केली.


