बेळगाव लाईव्ह : स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षमुळे टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिजचा दुर्दशा झालेला रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला असून हा रस्ता युद्धपातळीवर दुरुस्त करून सुरक्षित केला जावा, अशी मागणी या रस्त्यामुळे अपघातग्रस्त होऊन जखमी झालेल्या प्रसाद नामक एका युवकांनी केली आहे.
दुर्दशा होऊन धोकादायक बनलेल्या टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिजच्या रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती व्हावी यासाठी अनगोळचे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांसह या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांनी अलीकडेच रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यावेळी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी ओव्हर ब्रिजच्या रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती करून तो सुव्यवस्थित केला जाईल असे ठोस आश्वासन देऊन रास्तारोको रद्द करावीला होता. तथापि आजपर्यंत प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधीने आपल्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही परिणामी सध्या तिसरे रेल्वे गेट ओव्हर ब्रिज रस्त्याची बहुतांश ठिकाणी संपूर्ण वाताहात झाली असून त्यांना ग्रामीण भागातील दगड-माती, धुळीने माखलेल्या रस्त्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या पद्धतीने सदर रस्ता मृत्यूचा सापळा बनला असल्यामुळे वाहन चालकांमध्ये प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिजच्या खराब रस्त्यामुळे अलीकडेच प्रसाद नामक दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे. घरातील एकमेव कर्ता पुरुष असलेला प्रसाद अपघातग्रस्त होऊन अंथरुणाला खिळल्यामुळे सध्या त्याच्या घरच्यांना कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीत देखील प्रसाद याने बेळगाव लाईव्हशी बोलताना कशा पद्धतीने तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिजच्या खराब रस्त्यामुळे आपल्याला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अपघातग्रस्त होऊन तीन दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागले याची माहिती दिली.

अपघातामुळे आपल्याला सात दिवस नोकरीवर जाता आलेले नाही. माझ्या घरात मी एकटाच कमावणार आहे. अपघातात सुदैवाने मला कोणतीही गंभीर इजा झाली नाही अथवा जीव गमवावा लागला नाही. दुर्दैवाने तसे घडले असते तर त्याला कोण जबाबदार होते? असा सवाल करून अशी परिस्थिती येत्या काळात एखाद्यावर उद्भवता कामा नये. यासाठी माझी प्रशासनाला आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती आहे की त्यांनी गंभीर दुर्घटना घडण्याची वाट न पाहता युद्धपातळीवर तिसरे रेल्वे गेट ओव्हर ब्रिजचा खराब झालेला रस्ता शाश्वतरित्या त्वरेने दुरुस्त करावा, अशी मागणी प्रसाद यांनी केली.
याप्रसंगी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर हे देखील उपस्थित होते. दरम्यान, लोकांचा जीव गेल्यानंतरच तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिजचा रस्ता दुरुस्त होणार का? असा संतप्त सवाल सदर रस्त्याचा वापर करणारे वाहन चालक करू लागले आहेत.


