बेळगाव लाईव्ह : “हुक्केरी विद्युत सहकारी क्षेत्राच्या निवडणुकीत आम्हीच जिंकतो, असे त्यांनी सांगितले होते. तसेच, डिसिसी बँक आम्हीच जिंकणार म्हणून केवळ ‘हवा’ करून चालणार नाही. ही बँक कुणाच्या हाती दिल्यास जिल्ह्याचे भले होईल, याचा निर्णय जनता करेल,” अशा शब्दांत रमेश कत्ती यांनी जारकीहोळींवर निशाणा साधला.
मंगळवारी बेळगाव डिसिसी बँक संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तालुक्यात कोणाच्या हाती सत्ता द्यायची आणि जिल्ह्यात कोणाच्या हाती अधिकार दिल्यास चांगले होईल, हे लोकांना चांगलेच माहीत आहे. बेळगाव जिल्ह्याचे कोट्यवधी रुपये डिसिसी बँकेत जमा आहेत.
काही कमी-जास्त झाल्यास ५० लाख लोक रस्त्यावर येतील. त्यामुळे ५० लाख लोकांचा तोल सांभाळणारी ही बँक वाचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले. डिसिसी बँकेला नेतृत्वाची गरज नसते. बँकिंग क्षेत्रात कुणाची विशेष आवश्यकता नसते. बँकेने योग्य वेळी कर्ज दिल्यास सोसायटीची चांगली वाढ होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
हुक्केरी तालुक्यातील विद्युत सहकारी मतदारसंघामधून डिसिसी बँक संचालक पदासाठी मी अर्ज दाखल केला आहे. कोणत्या मतदारसंघात बिनविरोध निवड करायची की निवडणूक घ्यायची, याचा निर्णय त्या त्या तालुक्यातील नेते, हितचिंतक आणि जनता घेते. भालचंद्र जारकीहोळी किंवा रमेश कत्ती यांनी सांगितल्याने बिनविरोध निवड होत नाही.
मतदारच निर्णय घेतील, असे उत्तर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला दिले. डिसिसी बँक निवडणुकीत ‘पॕनेल’ तयार होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी केवळ हुक्केरी तालुक्यातून संचालक पदासाठी अर्ज दाखल केला आहे. इतरजण आपापल्या क्षेत्रातून अर्ज भरतील. त्यामुळे येथे पॕनेलचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी पत्रकारांना दिले.
डिसिसी बँक निवडणुकीत गरज वाटल्यास आणि कोणत्याही तालुक्यातील लोकांनी आग्रहाने बोलावल्यास मी नक्कीच प्रचाराला जाईन. अनेक तालुक्यातील लोकांनी मला बोलावले आहे, मात्र ते कोणत्या तालुक्यातील आहेत, हे मी सांगणार नाही. डिसिसी बँकेच्या संचालक पदासाठी मी ९ वेळा अर्ज दाखल केला आहे आणि जनतेची सेवा करणे हेच आमचे कार्य आहे, असे त्यांनी सांगितले.
‘दहा जागा आपल्या बाजूने आहेत,’ या सतीश जारकीहोळी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, “त्यांच्या वक्तव्याला उत्तर देण्याची मला काही गरज वाटत नाही,” असे कत्ती म्हणाले. ‘तुम्हाला बँकेपासून दूर ठेवले जात आहे,’ या प्रश्नावर, “दूर ठेवणे कुणाच्या हातात नाही. ही त्यांच्या बापाची मालमत्ता नाही,” अशा शब्दांत त्यांनी जारकीहोळी यांना परखड टोला लगावला.



