बेळगाव लाईव्ह : विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी बेळगाव जिल्ह्याला भेट दिली आणि पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी, त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीकास्त्र सोडले. “पाऊस आणि पुरामुळे घरे व पिकांचे नुकसान झालेले असताना बेळगावला न आलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या, आता केवळ विविध उद्घाटनांसाठी आणि बिर्याणी खाण्यासाठी येत आहेत,” असा आरोप आर. अशोक यांनी केला.
आर. अशोक यांनी बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातल्या नागनूर गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या बेळगावला येणार आहेत, त्यांना जिल्ह्याची नेमकी परिस्थिती कळावी यासाठी आम्ही आज शेतकऱ्यांची दुर्दशा पाहत आहोत.
” सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आलेला असताना, सिद्धरामय्या फक्त स्वतःच्या खुर्चीची काळजी करत आहेत आणि “पुढील पाच वर्षे मीच मुख्यमंत्री राहीन” या एकाच विषयावर रोज चर्चा करत आहेत, अशी टीका अशोक यांनी केली.
अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगाव जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत ५२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मात्र, दोन महिन्यांपासून एकाही मंत्र्याने किंवा आमदाराने या भागाला भेट दिली नाही. “मंत्री आले नाहीत म्हणून आमदार आले नाहीत, आमदार आले नाहीत म्हणून अधिकाऱ्यांनीही पाठ फिरवली” असे चित्र आहे.
आता भाजपचे नेते पाहणीसाठी आल्यामुळे जिल्हाधिकारी आणि तहसीलदार घटनास्थळी आले आहेत. त्यांनी केंद्र सरकारकडून आलेला एनडीआरएफचा निधी पूरग्रस्तांना न देता, तो काँग्रेसच्या ‘फ्री’ योजनांसाठी वळवल्याचा गंभीर आरोप केला. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकताना, ‘सोयाबीनच्या पिकांचे पूर्ण नुकसान झाले आहे. एकरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना, केवळ २-३ क्विंटलच पीक आले आहे. आजपर्यंत पाहणीसाठी एकही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आला नाही,’ अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली.





