बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील कुख्यात आणि आंतरराज्य गुन्हेगार सलीम उर्फ अंधा सलीम कमरुद्दीन सौदागर याच्यावर बेळगाव शहर पोलिसांनी ‘पीआयटी-एनडीपीएस’ कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
अंमली पदार्थ विरोधी कायद्यातील विशेष तरतुदीनुसार त्याला अटकेचा आदेश देण्यात आला आहे. बेळगाव पोलीस आयुक्तालय अस्तित्वात आल्यापासून या कायद्याखाली जारी केलेला हा पहिलाच आदेश आहे.
आरोपी सलीम उर्फ अंधा सलीम सौदागर हा सराईत गुन्हेगार असून, तो केवळ १२ एनडीपीएस (अंमली पदार्थ) कायद्याखालील प्रकरणांमध्येच नव्हे, तर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, घरफोडी आणि साक्षीदारांना धमकावणे अशा गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्येही सहभागी आहे. याशिवाय, हा आरोपी आंतरराज्य गुन्हेगार असून, त्याचे गुन्हेगारी कृत्य गोवा आणि महाराष्ट्र राज्यांमध्येही नोंदवले गेले आहे.
सलीम उर्फ अंधा सलीम याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीनुसार, त्याच्यावर एनडीपीएस कायद्याखाली १२ गुन्हे दाखल आहेत. या व्यतिरिक्त, त्याच्यावर मालमत्तेवरील २१ गुन्हे , १ खून आणि २ खुनाचा प्रयत्न तसेच साक्षीदारांना धमकावल्याच्या एका गुन्ह्यासह एकूण ३७ गंभीर प्रकरणांची नोंद आहे. आरोपीची मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे, त्याच्याविरुद्ध पीआयटी-एनडीपीएस कायदा १९८८ (सुधारित) कलम ३(१) अंतर्गत अटकेचा आदेश जारी करण्याची नियमानुसार शिफारस सक्षम प्राधिकरणाकडे करण्यात आली होती.
या शिफारसीनुसार, सक्षम प्राधिकरणाने अटकेचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार, आरोपी सलीम उर्फ अंधा सलीम सौदागर (रा. घर क्रमांक ३७३८, बागवान गल्ली, बेळगाव) याला बेळगाव मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.


