बेळगाव लाईव्ह :खानापूर (ता. जि. बेळगाव) येथील व्यायाम मंदिर जिमचा खेळाडू व स्वामी विवेकानंद शाळेचा विद्यार्थी पवन यल्लाप्पा कदम याने नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या 36 व्या अखिल भारतीय वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदक पटकाविले आहे.
खानापूरच्या पवन कदम याने दिल्ली येथे झालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील 17 वर्षाखालील 79 किलो वजनी गटात तिसरे स्थान मिळवत कांस्य पदक जिंकले.
कठोर परिश्रम, शिस्त आणि खानापूर व्यायाम मंदिरचे प्रशिक्षक प्रशिक्षक राहुल यल्लाप्पा सावंत यांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशामुळे पवन कदम याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राष्ट्रीय पातळीवरील वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुयश मिळवून पवन कदम याने व्यायाम मंदिर, खानापूर तसेच स्वामी विवेकानंद शाळा यांचे नांव उज्ज्वल केले असून खानापूरकरांसाठी अभिमानाचा क्षण निर्माण केला आहे.



