बेळगाव लाईव्ह : तिथीसाठी आलेले पाहुणे जेवून गेलेच नाहीत तर ‘किंमती दागिने घेऊनही’ गेले! अशी फिर्याद बेळगाव जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक भीमा शंकर गुळेद यांच्याकडे एका दांपत्याने केली आहे.
नवर्याच्या मोठ्या भावाच्या तिथीच्या जेवणासाठी आलेल्या नातलगांनी घरातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यात नेसरगी येथे उघडकीस आली आहे.
यासंबंधी प्रीती निलगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
नवर्याच्या मोठ्या भावाच्या स्मरणार्थ आयोजित तिथीच्या कार्यक्रमाला आलेले शैला निलगार, प्रविण निलगार आणि नवीन निलगार यांनी घरातील सोन्याचे दागिने चोरून फरार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. “आम्हाला न्याय द्या,” अशी मागणी प्रीती निलगार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली.
या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी तात्काळ नेसरगी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून योग्य तपास करून पीडितांना न्याय देण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना नेसरगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.





