बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समिती (दिशा) च्या बैठकीत खासदार जगदीश शेट्टर यांनी जाती सर्वेक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले.
खासदार जगदीश शेट्टर यांच्या अध्यक्षतेखाली आज बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीची बैठक पार पडली. जाती सर्वेक्षणाचा कालावधी वाढवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या वाढल्या आहेत. यामुळे अभ्यासक्रम मागे पडण्याची शक्यता असून, मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना खासदार शेट्टर यांनी केली.
यावर शिक्षण विभागाच्या उपसंचालिका लीलावती हिरेमठ यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, शासकीय सर्वेक्षण कामासाठी ९८ टक्के प्राथमिक शिक्षकांचा वापर केला गेला असून, शहरी भागात केवळ माध्यमिक शिक्षकांची मदत घेण्यात आली आहे. तसेच, विद्यार्थ्यांसाठी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत विशेष वर्ग आयोजित केले जात आहेत.
या उत्तरावर खासदारांनी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले. यावर शिक्षण अधिकाऱ्यांनी अधिक स्पष्टता आणली की, सर्वेक्षणात प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा मोठ्या संख्येने वापर टाळला असून, अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांनाही समाविष्ट केले आहे.
दरम्यान, बिम्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सध्या के.एल.ई. च्या डॉक्टरांची सेवा तात्पुरत्या स्वरूपाची आहे. यावर खासदार शेट्टर यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. “या रुग्णालयासाठी कायमस्वरूपी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक होणे गरजेचे आहे. डॉक्टरच नसतील तर रुग्णालय बांधून काय उपयोग आहे?” असा थेट प्रश्न त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी गडाद यांना विचारला.
यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निदर्शनास हा मुद्दा आणून देण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे आश्वासन दिले आहे.
या बैठकीला चिक्कोडी लोकसभेच्या सदस्य प्रियंका जारकीहोळी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.




